बस चालकालाच त्रिकूटाने झोडपले : सोशल मिडीयात झाला व्हिडिओ व्हायरल


The bus driver was beaten up by the trio: The video went viral on social media चाळीसगाव : बसने दुचाकीला ओव्हरटेक केल्याच्या रागातून त्रिकूटाने बस चालकाला झोडपून काढले. या बाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयात शुक्रवारी चांगलाच व्हायरल झाला. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ओव्हरटेक केल्याचा राग अनावर
आबा लक्ष्मण नालकर (रा.शिंदी, ता.चाळीसगाव) हे चाळीसगाव बस डेपोमध्ये बस चालक म्हणून नोकरीला आहे. 16 जुलै रोजी चाळीसगाव-कुंझर बस क्रमांक (एम.एच.20 डी. 9806) दुपारी चार वाजता चाळीसगावहून कुंझरला जाण्यासाठी निघाली. शहरापासून पुढे धुळे रोडवरील विराम गार्डनजवळ बसच्या पुढे दोन दुचाकी डबल सीट जात होत्या. त्यावेळी चालक आबा नालकर यांनी दोन्ही दुचाकींना ओव्हरटेक करत बस पुढे नेली. याचा राग आल्याने दुचाकीवरील तिघांनी भोसर फाट्याजवळ बस आडवून थांबवली. त्यातील एकाने तू आमच्या मोटरसायकलला ओव्हरटेक का केले असे बोलून अश्लील शिवीगाळ केली. तू दहिवद गावाजवळ ये तुला पाहून घेतो’ अशी धमकी देऊन पुन्हा दुचाकीवर बसून पुढे निघून गेले. दरम्यान बस चालकाने प्रवाशांना उतरवले व नंतर बस दहिवद गावाजवळ आल्यानंतर पुन्हा या तिघांनी बस थांबवून चालक आबा नालकर यांना कॉलर पकडून बस कॅबिनच्या बाहेर ओढत बेदम मारहाण केली. यात नालकर हे गंभीर जखमी झाले. बसमधील वाहक सचिन मदनदास बैरागी व प्रवाशांनी आवराआवर केली.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेबाबत चालक आबा नालकर यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नवल भीमराव पवार, भाईदास सुभाष बोरसे, यशवंत उर्फ सनी भीमराव पवार (तिन्ही रा.दहिवद, ता.चाळीसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !