चांगदेवातील वयोवृद्धाच्या खुनाची उकल : आरोपी जाळ्यात


जमिन विक्रीच्या पैशांसाठी तगादा लावल्याने काटा काढल्याची आरोपीची कबुली

मुक्ताईनगर : तालुक्यातील चांगदेव कासारखेडा शिवारातील शेतात वृद्ध शेतमजुर भिका दयाराम पाटील (65, मूळ रा.जुनोना, ता.भुसावळ) यांची शिरच्छेद करून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अवघ्या 24 तासांच्या आता खुनाचा उलगडा करण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. खून प्रकरणी मयताच्या जावयाचा भाऊ प्रकाश दयाराम पाटील (42) यास अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. जमीन विक्रीतून आलेल्या पैशांसाठी मयत तगादा लावत असल्याने त्याचा काटा काढल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी दिली.

पैशांसाठी तगादा लावल्याने काढला काटा
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संशयीत आरोपी प्रकाश पाटील याने भिका पाटील यांच्याकडून 90 हजारांना घेतलेली जमीन नंतर 10 लाखांना विकल्याने त्यातून पैसे मिळण्यासाठी भिका पाटील हे तगादा लावत होते शिवाय यातून अनेकदा उभयंतांमध्ये खटकेदेखील उडत होते. शुक्रवारी भिका पाटील एका दारूच्या गुत्त्यावर आल्यानंतर आरोपी प्रकाश पाटीलदेखील तिथे आला व त्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र पैसे नसल्याचे सांगितल्याचा त्याला राग आला व भिका पाटील हे विनायक बाजीराव पाटील यांच्या कासारखेडा शिवारातील केळी बागेत पोहोचल्यानंतर आरोपीने पाठीमागून जावून त्यांच्यावर सुरुवातीला विळ्याने जोरदार वार केल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडले तर आरोपीने त्यांचे रूमालाने पुन्हा पाय बांधून पुन्हा जोरदार विळ्याने वार करताच शीर धडावेगळे झाले. गुन्हा केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्यांनी आरोपीची खोलवर चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, शनिवारी आरोपी प्रकाश पाटील यास न्यायालयात हजर केले असता त्यास 4 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !