फडणवीसांच्या ‘मी’ पणामुळेच महाराष्ट्राने त्यांना नाकारले
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बोचर्या शब्दात टिका
मुंबई : गेल्या निवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता. ते सत्तेत होते मात्र फडणवीसांच्या वक्तव्यांमध्ये ‘मी’ पणाचा दर्प जाणवतो. त्यांची भाषण पाहा. त्यात सत्तेचा दर्प होता. मी म्हणजे सर्व काही, बाकीचे सगळे तुच्छ आहेत, असा अविर्भाव होता. महाराष्ट्रातील जनतेला हे आवडत नाही, त्यांना ‘मी’पणा आवडत नाही, त्यांना विनम्रता आवडते म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाकारले, अशा बोचर्या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर एका वृत्तवाहिनीशी मुलाखत देताना टिका केली.
फडणवीसांवर भाजपचे राज्यासह दिल्लीतले नेते नाराज
शरद पवार म्हणाले की, फडणवीस यांच्यावर भाजपचे राज्यातले नेते नाराज आहेत. अमी दिल्लीत भाजपच्या अनेक नेत्यांना भेटलो, चर्चा झाल्या. त्यामधून मला एक गोष्ट कळली आहे की, फडणवीसांवर भाजपचे दिल्लीतले अनेक नेतेदेखील नाराज आहेत. फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते, परंतु राज्याच्या राजकारणात त्यांना मोठं स्थान निर्माण करता आलं नाही. ते अजून तिथेच आहेत. मी म्हणजे महाराष्ट्र, मी म्हणेल तोच महाराष्ट्र ही त्यांची भूमिका राज्यातील जनतेला मान्य नाही. त्यांच्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने कौल दिला परंतु त्याचं श्रेय फडणवीसांना जात नाही. त्यामागे मोदींचा चेहरा आहे.

