भुसावळातील मृद व जलसंधारण विभागात 86 लाखांचा अपहार : वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा
Misappropriation of ₹86 lakh in Bhusawal’s Soil and Water Conservation Department: Case registered against senior clerk. भुसावळ (26 जून 2026) : भुसावळातील मृद व जलसंधारण उपविभागीय कार्यालयात कार्यरत वरिष्ठ लिपिकाने शासकीय वेतन प्रणालीत कथित फेरफार करून तब्बल 86 लाख आठ हजार 643 रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ लिपिक तनुज रवींद्र सैंदाणे (रा.पवन हिल्स, जळगाव) विरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे कार्यालयातील कर्मचार्यांचे वेतन व पूरक देयके तयार करणे तसेच कोषागाराशी संबंधित कामकाजाची जबाबदारी होती. या अधिकाराचा गैरवापर करून फेब्रुवारी 2021 ते मार्च 2026 या कालावधीत ’सेवार्थ’ प्रणालीमध्ये स्वतःच्या मूळ वेतनात आणि विविध भत्त्यांमध्ये कथितरीत्या नियमबाह्य वाढ करण्यात आली. या फेरफाराच्या आधारे तयार करण्यात आलेली वेतन बिले खरी असल्याचे भासवून ती आहरण व संवितरण अधिकारी तथा उपअभियंता निनाद विवेक रत्नपारखी यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आली. त्यानंतर ही बिले भुसावळ कोषागार कार्यालयात सादर करून आरोपीने स्वतःच्या बँक खात्यात 70 लाख 38 हजार 37 रुपये जमा करून घेतली.


शहर पोलिसात गुन्हा
तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एनपीएस व आणि डीसीपीएस कपातीतील अधिकची वाढ रक्कम 15 लाख 70 हजार 606 रुपये नियमानुसार स्वतःच्या एनपीएस खात्यात वर्ग करीत आरोपीने शासनाची एकूण 86 लाख आठ हजार 643 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उपअभियंता निनाद विवेक रत्नपारखी (32, रा. आदर्श नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा 25 जून रोजी नोंदविण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.
