पाचोरा शहरात चोरटे शिरजोर : एकाच रात्री तीन दुकाने फोडली
लपाचोरा : शहरातील जामनेर रोडवर कै. सुपडू भादू शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शितल प्रोव्हिजन, सेवा मेडिकल आणि त्र्यंबक गरबड वाणी अशी तीन दुकाने फोडली. या प्रकाराने शहरातील व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे.
व्यापारी वर्गात उडाली खळबळ
पाचोरा येथील कै. सुपडु भादु शॉपिंग कॉम्प्लेक्समधील शीतल प्रोव्हीजनचे मालक रमेश लक्ष्मण वाणी हे ११ आगस्ट रोजी रात्री ८:३० वाजता दुकान बंद करून घरी गेले असता दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता शेजारील दुकानदार रमेश अग्रवाल हे त्यांचे दुकानात आल्यानंतर त्यांनी रमेश वाणी यांना फोन करुन तुम्ही दुकान बंद करण्याचे विसरले काय ? अशी विचारणा केली असता रमेश वाणी हे आश्चर्यचकित होवुन त्यांनी दुकानाच रस्ता धरला असता दुकानाचे शटर उघडलेल्या अवस्थेत आढळून आले. व दुकानातील ५०० रुपयांची चिल्लर ड्रावर मधुन गायब झालेली दिसली. व दुकानात बसविलेले दोन सी. सी. टी. व्ही. कॅमेरे तोडफोड करुन त्यांचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. मात्र त्यांच्या दुकानातील एक सी. सी. टी. व्ही. कॅमेरा सुरू असल्याने त्यात दोन अज्ञात चोरटे चोरी करत असतांनाच सी. सी. टी. व्ही. मध्ये कैद झाले आहेत. त्यांचे जवळ असलेले सेवा मेडिकलचे संचालक विशाल ब्राह्मणकर यांच्या दुकानाचे शटरचे कुलुप टामीच्या साहाय्याने तोडुन ५०० रुपयांची चिल्लरची चोरी झाली.

पोलिसांनी गस्त वाढवण्याची अपेक्षा
त्र्यंबक गरबड वाणी या किराणा दुकानाचे संचालक मिलिंद पुंडलिक वाणी यांचे दुकान फोडुन दुकानातील ६ हजार रुपये चोरी करण्यास अज्ञात चोरटे यशस्वी झाले आहे. त्याला लागुनच असलेल्या राम फोटो स्टुडिओ हे दुकान देखील चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला असता दुकानास मध्यवर्ती लाॅक असल्याने ते लाॅक तोडण्यात चोरटे अयशस्वी झाले. फोडलेल्या दुकानांची कुलूप जवळच असलेल्या कचरा कुंडीत टाकुन अज्ञात चोरटे पसार झाले असुन घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलिस काॅन्स्टेबल विनोद बेलदार, गजानन काळे, योगेश पाटील यांनी भेट देऊन घटनाक्रम जाणुन घेतला.
