आमदार शिरीष चौधरींना मंत्रीपद मिळण्यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व दिल्लीत


फैजपूर : स्वातंत्र्य काळानंतर यावल-रावेर मतदारसंघात काँग्रेसला एकदाही मंत्रीपद मिळाले नाही मात्र या निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी यांनी चांगली मजल मारून काँग्रेस अस्तित्वात असल्याचे सिद्ध केले आहे. आता आमदार चौधरी यांना मंत्री पद मिळावे म्हणून जिल्ह्याच्या नेतृत्वाने दिल्ली दरबारी जाऊन काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे.

आमदारांना मंत्री पदासाठी प्रदेशाध्यक्षांची चर्चा
जिल्ह्यात काँग्रेसला गेल्या 10 वर्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांना मंत्री पद देण्यात यावे यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे कॅबीनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी चर्चा केली. जळगाव जिल्ह्याला मंत्रीपद मिळाल्यास काँग्रेस बळकट करण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. जळगाव जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना तब्बल तीन मंत्रीपदे या जिल्ह्यात होती मात्र गेल्या 20 वर्षांपासून जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला मंत्रीपद आलेच नाही. आजच्या स्थितीत कमकुवत झालेल्या काँग्रेस बळकटी देण्यासाठी एकमेव असलेले आमदार शिरीष चौधरी यांना मंत्रीपद मिळणार काय? याकडेच आता जिल्हावासीयांचे लक्ष आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन घेण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसची नाळ घट्ट जुळली. जिल्ह्याने काँग्रेसला चांगली साथ दिली. त्यामुळे काँग्रेसच्या सत्ताकाळात जिल्ह्यात पक्षाचे तीन-तीन मंत्री होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, स्व.मधुकरराव चौधरी, स्व.के. एम. पाटील, स्व.डी. डी.चव्हाण यांनी काँग्रेसच्या सत्तेच्या काळात मंत्रीपद भूषविले आहे.




आमदार चौधरी यांना मंत्री पद मिळण्याची जमेची बाजू
जळगांव जिल्ह्यात काँग्रेस-रावेर विधानसभेची एक जागा सोडण्यात आली. ती जागा आमदार शिरीष चौधरींना निवडून आणायची होती आणि तब्बल 15 हजारांच्या मताधिक्याने आमदार शिरीष चौधरी निवडून आले. त्याचबरोबर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांचे दिल्ली दरबारी गांधी परीवारात चांगले संबंध असल्याने आमदार चौधरींना मंत्री पद मिळू शकते तसेच आमदार चौधरी यांचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी जवळीक व जिल्ह्यात काँग्रेसला नवीन ऊर्जा मिळावी यासाठी आमदार शिरीष चौधरींना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. इतकेच काय तर आमदार शिरीष चौधरी यांच्या समर्थकांनी आमदार चौधरी यांना शिक्षण राज्य मंत्री पद मिळाल्याचे सोशल मिडियावर अभिनंदन सुद्दा केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !