Death Of Youth In Pachora Due to Electric Shock पाचोरा शहरातील पोलिस कर्मचार्याच्या एकुलत्या एक मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
Death Of Youth In Pachora Due to Electric Shock पाचोरा : गणेशोत्सवासाठी गावी परतलेल्या 19 वर्षीय तरुणाचा विजेच्या शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील पोलिस लाईनीत घडली. आदित्य अशोक महाजन (19) असे मयत तरुणाचे नाव आहे. आदित्य हा चाळीसगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या वाहनावरील चालक असलेल्या अशोक महाजन यांचा एकुलता एक मुलगा होय.
गणेशोत्सवासाठी गावी परतला तरुण
पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या वाहनावर अशोक महाजन हे चालक असून त्यांचा एकुलता एक मुलगा आदित्य अशोक महाजन हा गेल्या पाच दिवसांपूर्वी नांदेड येथून गणेशोत्सवासाठी घरी परतला होता. शहरातील भडगाव रोडवरील पोलिस लाईन या राहत्या घरी सायंकाळी सात वाजता पिण्याचे पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार चालू करण्यासाठी तरुण गेला असता विजेचा आदित्य यास विजेचा जोरदार शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

तरुणाच्या मृत्यूने हळहळ
मयत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित साळुंखे यांनी केले. मयत आदित्यची बहिण पुण्यात अभियंत्रीकीचे शिक्षण घेते. तरुणाच्या पश्चात आई, वडील व बहिण असा परीवार आहे. तरुणाच्या मृत्यूने पोलिस लाईनीत शोककळा पसरली.
