Jubilation in Bhusawal Division on the establishment of Adishakti भुसावळ विभागात आदिशक्तीच्या स्थापनेचा जल्लोष


Jubilation in Bhusawal Division on the establishment of Adishakti भुसावळ : भुसावळसह तालुका व विभागात आदिशक्तीच्या स्थापनेचा रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरूच होता. दोन वर्षानंतर नियंत्रणात आलेला कोरोना व शासनाने निर्बंध शिथिल केल्याने भाविकांमध्ये मोठे चैतन्याचे वातावरण आहे. दिवसभर भाविकांसह मंडळांनी वाजत-गाजत देवीची मूर्ती मंडळांपर्यंत नेत विधीवत स्थापना केली. घटस्थापनेच्या मुहूर्तानिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल झाली. सराफा बाजारातही ग्राहकांची मोठी वर्दळ होती तर वाहन बाजारात मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी करण्यात आल्याने विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

भुसावळात रात्री उशिरापर्यंत घटस्थापनेचा जल्लोष
भुसावळ :
कोरोना संकट ओसरल्यानंतर यंदा प्रथमच निर्बंध शिथिल होवून पार पडत असलेल्या नवरात्रोत्सवामुळे भाविकांमध्ये चैतन्य आहे. शहरात 161 तर ग्रामीण भागात 150 मंडळांतर्फे दुर्गात्सव मंडळांनी घटस्थापना केली. नवरात्रोत्सवानिमित्त सोमवारी दिवसभ बाजारपेठेत घट, पुजेचे साहित्य, झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी भाविकांनी गर्दी झाली.

पूजेच्या साहित्याला मागणी
सोमवारी बाजारात विविध ठिकाणी दुर्गामातेच्या पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी झाली होती. मखमलीचे आसन, देवीच्या अंगावर टाकण्याची ओढणी, भगवा झेंडा, नारळ तसेच झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. कोरोनामुळे गेले दोन वर्ष व्यवसाय झाला नसलातरी यंदा मात्र व्यावसायीकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवामुळे शहरात झेंडूच्या फुलांची सुमारे 50 क्विंटल आवक झाली असून सर्वत्र झेंडूच्या फुलांची दुकाने शहरात थाटण्यात आली तर दसर्‍यापर्यंत झेंडूच्या फुलांची आवक कायम राहणार असून भाविकांची मोठी मागणी पाहता शेतकर्‍यांमध्ये आनंदाची लहर आहे.

मुक्ताई जन्मोत्सव उत्साहात
मुक्ताईनगर :
संत मुक्ताई जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून अश्विन शु.प्रतिपदा (घटस्थापना) दिवशी तापी पूर्णा परीसर श्री स्वामी समर्थ सेवेकरी परीवारातर्फे भी दुर्गा सप्तशती पारायण, संत मुक्ताई विजय ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पुष्पवृष्टी व नाम गजर करून आई मुक्ताई जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे मार्गदर्शक परम पूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकरी परीवारातर्फे पारायण सोहळा पार पडला. यावेळी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, हभप रवींद्र महाराज हरणे, हभप उद्धव महाराज जुनारे यांनी संत मुक्ताई मंदिर परीसर सेवेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सेवेकरी व भाविकांतर्फे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे आभार मानण्यात आले.

यावल तालुक्यात 198 मंडळांकडून घटस्थापना
यावल : शहर व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 57 गावात 181 सार्वजनिक व 17 खाजगी अशा 198 दुर्गोत्सव मंडळांनी घटस्थापना केली. रात्री उशिरापर्यंत धार्मिक विधी आटोपल्यानंतर घटस्थापना झाली. शहरातील विविध शाळांच्या वतीने मिरवणूक काढत घट स्थापना करण्यात आली तर यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत 57 गावात एकूण 181 सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ व 17 खाजगी मंडळांनी घटस्थापना केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !