गांजा शेती प्रकरणी अटकेतील संशयीताची धुळे कारागृहात आत्महत्या


धुळे : शिरपूर पोलिसांनी गांजा शेती केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयीत आरोपीने धुळे जिल्हा कारागृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. जामसिंग जसमल पावरा (70, रा.फत्तेपूर शिवार, सांज्यापाडा, ता.शिरपूर) असे मयताचे नाव आहे. धुळे शहर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

14 लाखांच्या गांज्या शेती प्रकरणी केली होती अटक
शिरपूर तालुका पोलिसांनी सांज्यापाडा फत्तेपूर शिवारातील गांजा शेतीवर अलीकडेच कारवाई करीत 14 लाखांची पाच ते सहा फुटांची गांजाची झाडे जप्त करीत जामसिंग पावरा विरोधात गुन्हा दाखल केला होता व अटकेनंतर त्यास 30 सप्टेंबर रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यााल्याने त्यांची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. वयोवृद्ध असल्यामुळे त्याला कारागृहातील बॅरेक क्रमांक दोनमध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे शौचालयात कपड्याच्या सहाय्याने पावरा यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कारागृह कर्मचार्‍यांनी वरिष्ठांसह पोलिसांना माहिती दिली. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

अधिकार्‍यांनी भेट देत केली पाहणी
धुळे न्यायालयाचे न्या.चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !