साकळीत घराची भिंत कोसळली-वृद्ध महिला गंभीर जखमी
यावल : तालुक्यातील साकळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगराच्या समोरील भागातील एका घराची भिंत कोसळून 65 वर्षीय वृद्ध महिला गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शुक्रवार, 13 रोजी दुपारी घडली. जखमी वृद्धेवर जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. साकळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगराच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यालगतच्या भागात कमल टोपलू सुरवाडे यांच्या मालकीचे मातीचे कच्चे-पक्के बांधलेले घर आहे. घराची जवळपास दहा ते बारा फूट उंच भिंत 13 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक कोसळली असता विटा मातीच्या ढिगार्याखाली याच भागातील रहिवाशी असलेली मोगाबाई समरद सुरवाडे (65) या खाटी सहित दाबल्या गेल्या. त्या भिंतीच्या जवळपास खाटेवर विश्रांतीसाठी बसलेल्या होत्या. या दुदैवी घटनेत सदरील वृद्ध महिला गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांचा एक पाय मोडला गेलेला आहे तर दुसर्या पायाला आणि हाताला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे तसेच छातीला मुका मार बसलेला असून मानेला सुद्धा दुखापत झालेली आहे.
घटना घडताच उडाली तारांबळ
अचानक घडलेल्या या घटनेत वृद्धा दाबली गेल्याचे पाहताच घटनास्थळी हजर असलेल्या महिलांची एकच तारांबळ उडाली व त्यांनी आरडाओरड करत जखमी महिलेला मातीचा ढिगारा खालून बाहेर काढले व नागरीकांच्या मदतीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र सदर जखमी महिलेला गंभीर दुखापत झाली असल्याने लागलीच त्यांना तात्काळ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी महिला मोलमजुरी करणारी आहे. ही घटना घडण्या आगोदर काही वेळ अगोदर या ठिकाणी लहान मुले ही खेळत होती मात्र या मुलांचे दैव बलवत्तर होते म्हणून घटना घडण्यापूर्वीच ही मुलं बाजूला खेळायला निघून गेलेली होती. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सदरील घटनेमुळे या भागात भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले.



