बोदवड शहरावर आता ‘तिसर्या डोळ्याची’ नजर
बोदवड : शहरातील वाढत्या चोरीच्या घटना पाहता व सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेत नगरपंचायत अंतर्गत व पोलिस प्रशासानाच्या सहकार्याने शहरातील प्रमुख 22 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बोदवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहरात वाढत्या चोरीच्या घटना पाहता पोलिस प्रशासनाला या चोरट्यांना पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास फुटेजवरून चोरट्यांना पकडणे आता सोपे होणार आहे.
तिसर्या डोळ्यामुळे अप्रिय घटनांना आळा
सीसीटीव्हीमुळे अप्रिय घटना रोखण्यासह चोरीच्या घटना थांबण्याची आता आशा आहे. सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन बोदवड नगर पंचायत प्रशासनाने व राष्ट्रवादीचे गटनेते देवेंद्र खेवलकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून जळगाव जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी19 सप्टेंबर 2019 रोजी दिलेल्या मंजुरीनंतर जिल्हा वार्षिक योजना सन 2019-2020 (नाविण्यपूर्ण योजना) अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 25 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. शहरातील प्रमुख 22 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यातील 12 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
या निर्णयाबद्दल नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, नगरपंचायत नगराध्यक्षा मुमताजबी हाजी सईद बागवान, भाजपा गटनेते कैलास चौधरी व राष्ट्रवादीचे गटनेते देवेंद्र खेवलकर व सर्व नगरसेवक व नगरसेविका यांचे कौतुक केले जात आहे.



