भीषण अपघातात चौघे जण जागीच ठार


Four People Died In Two Accidents in Daund Area दौंड : वेगवेगळ्या अपघातात चौघे जण जागीच ठार झाल्याची घटना दौंड परीसरात घडली. दौंड-पाटस रोडवर रविवारी रात्री झालेल्या अपघातात काष्टी (ता.श्रीगोंदा) तीन युवकांचा अपघाती मृत्यू झाला तर सोमवारी दुपारी दौंड शुगर कारखाना परीसरात झालेल्या अपघातात दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य पोपटराव खोमणे यांचा मृत्यू झाला.

तिघे युवक जागीच ठार
पाटस येथून काष्टीकडे दुचाकीवरून (एम.एच.16 बी.पी.9280) निघाले असतान उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीचा वेग (ट्रॅक्टर एम.एच.42 वाय.2943) ट्रॉली (ट्रॉली क्र.एम.एच.42 एफ.6151) अचानक कमी झाल्याने या ट्रॉलीच्या पाठीमागील भागास दुचाकी धडकल्याने तिघे ठार झाले. या अपघातात हृषीकेश महादेव मोरे (26), स्वप्नील सतीश मनुचार्य (24), गणेश बापू शिंदे (26, तिघेही रा.काष्टी, ता.श्रीगोंदा) यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी अपघातातील तिन्ही जखमींना तातडीने दौंड येथील रुग्णालयात आणले डॉक्टरांनी मृत घोषित केले. ट्रॅक्टर चालक विशाल निवृत्ती दिवेकर (रा. वरवंड, ता. दौंड) याच्या ट्रॅक्टर चालविण्याच्या चुकीमुळे हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रॅक्टर चालक पसार झाला आहे.



माजी सदस्याचा अपघाती मृत्यू
दुसर्‍या एका अपघातात पंचायत समितीचे माजी सदस्य पोपटराव खोमणे (67, रा.खोरवडी, ता.दौंड) यांचे अपघाती निधन झाले. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोपटराव खोमणे हे दौंड शुगर कारखान्याकडून आलेगावकडे निघाले होते. दरम्यान, आलेगावकडून भरधाव वेगाने येणार्‍या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पोपटराव खोमणे जागीच ठार झाले. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक पळून गेला. पोपटराव खोमणे हे दौंड तालुक्यातील खोरवडी गावचे रहिवासी असून, या गावचे ते पंधरा वर्षे सरपंच होते. लिंगाळी गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडून आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !