भावनांचा स्वीकार करणे महत्त्वाचे : भुसावळात समुपदेशक आरती चोधरी

मानसिक ताण आणि बाह्य सौंदर्याचा परस्परसंबंध उलगडला : सक्षम कौन्सिलींग सेंटर व इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा संयुक्त उपक्रम


भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य दिनानिमित्त सक्षम कौन्सिलींग सेंटर, भुसावळ आणि इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानसिक ताण आणि बाह्य सौंदर्य’ या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ.प्राची प्रताप आणि भुसावळातील समुपदेशक आरती चौधरी यांनी यावेळी मार्गदर्शन करत मानसिक आरोग्य, शारीरिक सौंदर्य आणि दैनंदिन जीवनातील ताणतणाव यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा योगिता वायकोळे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, तर डॉ. सुवर्णा गाडेकर यांची विशेष उपस्थिती होती.

भावनांचा स्वीकार करणे महत्त्वाचे
समुपदेशक आरती चौधरी यांनी समाजात मानसिक आरोग्याविषयी वाढत असलेल्या जागरूकतेबद्दल समाधान व्यक्त केले. सक्षम कौन्सिलींग सेंटरतर्फे गेल्या पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य दिनानिमित्त सातत्याने वेबिनार आयोजित करण्यात येत असून, दरवर्षी सहभागींची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. सकारात्मक राहणे महत्त्वाचे असले, तरी मनात कधीतरी नकारात्मक भावना निर्माण झाल्यास स्वतःला दोषी समजू नये, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. आपल्या भावनांचा स्वीकार करणे आणि त्यांना समजून घेणे हे मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येकाचा जीवन प्रवास वेगळा
सोशल मीडियावर इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना केल्यामुळे अनेकदा व्यक्ती स्वतःच्या आयुष्याबद्दल असमाधानी होते. मात्र, प्रत्येकाचा जीवनप्रवास वेगळा असतो आणि सोशल मीडियावर दिसणारे चित्र म्हणजे संपूर्ण आयुष्य नसते, तर त्यातील काही निवडक क्षण असतात. त्यामुळे स्वतःच्या आनंदाचे आणि भावनिक स्वास्थ्याचे मोजमाप सोशल मीडियावरून करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

ताणाचा त्वचा आणि केसांवरही परिणाम
त्वचारोग तज्ज्ञ डॉ.प्राची प्रताप यांनी मानसिक ताणाचा त्वचा आणि केसांवर होणारा परिणाम शास्त्रीय दृष्टिकोनातून स्पष्ट केला. ताणतणावामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य काळजी घेणे, ताणाचे व्यवस्थापन करणे आणि गरजेनुसार वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्वचेवरील पांढरे डाग अर्थात कोड या विषयाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. अशा समस्यांकडे अंधश्रद्धा किंवा गैरसमजांच्या आधारे न पाहता योग्य माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रश्नोत्तरांतून शंकांचे निरसन
या वेबिनारमध्ये जळगाव येथील क्षमा फेगडे यांनी विषयाशी संबंधित समर्पक प्रश्न विचारून चर्चेला अधिक माहितीपूर्ण आणि संवादात्मक स्वरूप दिले. भुसावळ, जळगाव, नाशिक आणि पुणे येथील अनेक नागरिक ऑनलाइन सहभागी झाले होते. प्रश्नोत्तरांच्या सत्रात तज्ज्ञांनी सहभागींच्या शंकांचे निरसन केले. डॉ. उर्मी ठक्कर यांनी झूम प्लॅटफॉर्मवरील तांत्रिक व्यवस्थापनासाठी सहकार्य केले. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे, ताणतणावाकडे सकारात्मक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे आणि मानसिक स्वास्थ्यासोबतच शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

मानसिक आरोग्याची काळजी गरजेची
मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही चैनीची बाब नसून निरोगी जीवनाची मूलभूत गरज आहे. मनातील भावनांना समजून घेणे, इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःचा स्वीकार करणे आणि ताणतणाव जाणवल्यास मदत घेण्यास संकोच न करणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याविषयीचे गैरसमज दूर करून स्वतःसह कुटुंबीयांच्या भावनिक स्वास्थ्यालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन या वेबिनारच्या माध्यमातून करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !