चोपड्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात अनिलराज पाटील यांच्या ‘मातृत्व’ चित्राला विशेष पुरस्कार


चोपडा (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : शहरातील आंतरराष्ट्रीय चित्रकार अनिलराज पूनमचंद पाटील यांनी आपल्या कलाकौशल्याच्या जोरावर चोपड्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे आयोजित क्रिएटिव्ह ड्रॉइंगच्या 27 व्या सीझनमधील आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनात त्यांच्या ‘मातृत्व’ या चित्राला विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

क्रिएटिव्ह ड्रॉइंगच्या वतीने ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात अनिलराज पाटील यांनी सहभाग नोंदवला होता. सात दिवसीय या चित्रप्रदर्शनात विविध कलावंतांनी सहभाग घेतला. यावेळी अनेक विषयांवरील चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनिलराज पाटील यांच्या ‘मातृत्व’ या पेन-इंक माध्यमातील चित्राने विशेष लक्ष वेधून घेतले.

‘मातृत्व’ चित्रातून आई-मुलाच्या नात्याचे भावपूर्ण दर्शन
अनिलराज पाटील यांनी ‘मातृत्व’ हे चित्र पेन-इंक माध्यमातील स्टिपलिंग या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत साकारले आहे. या चित्रात एका आईने आपल्या लहान बाळाला जवळ घेतल्याचे भावपूर्ण दृश्य रेखाटण्यात आले आहे. चित्राच्या पार्श्वभूमीवर निसर्ग आणि रात्रीचे वातावरण साकारण्यात आले असून, सूक्ष्म रेषा व ठिपक्यांच्या माध्यमातून चित्राला कलात्मक उठाव देण्यात आला आहे. आई आणि बाळ यांच्यातील प्रेम, जिव्हाळा आणि वात्सल्याचे दर्शन घडवणार्‍या या चित्राला परीक्षकांकडून विशेष पारितोषिकासाठी निवडण्यात आले.

स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव
क्रिएटिव्ह ड्रॉइंग विभागाचे प्रमुख उत्सव गुप्ता यांच्याहस्ते अनिलराज पाटील यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्या कला प्रवासाचे कौतुक करण्यात आले तसेच भविष्यातील कलात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

अनिलराज पाटील यांच्या या यशामुळे चोपडा शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. त्यांच्या यशाबद्दल कलाक्षेत्रातून आणि परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !