हिवाळी अधिवेशन : सेना-भाजपा आमदारात धक्काबुक्की
नागपूर : शेतकर्यांना 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी अन्यथा कामकाज करू नये, अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतल्यानंतर विरोधकांनी या मुद्यावरून विधानसभेत गोंधळ घातला तर याच मुद्द्यावरुन संजय गायकवाड आणि अभिमन्यू पवार यांच्यात वादावादी झाली. यानंतर विधानसभेचे कामकाज सुरुवातीला अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने गोंधळातच दोन विधेयकं मंजूर केली आणि कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं.
सरसकट कर्जमाफी द्या
सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय सभागृहातील कामकाज चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला तर शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून आंदोलन केलं. विरोधी आमदार ‘सामना’ वृत्तपत्राच्या जुन्या हेडलाईन्सचे फ्लेक्स घेऊन आले. मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांधावर आलो आहे – उद्धव ठाकरे अशा मजकुराचे हे फ्लेक्स होते. या प्रकारानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वपक्षीय गट नेत्यांना दालनात बोलावले. सभागृहाचे कामकाज नियमाने चालावे यासाठी अध्यक्षांनी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली.

