हिवाळ्यात तापला आखाडा : कुर्हा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
कुर्हा : कुर्हा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छूकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यतील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने कुर्हा येथे मोठी चुरस पहावयास मिळणार आहे. सरपंच लोकनियुक्त असून ओबीसी असल्यामुळे अनेक दिग्गज या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याची शक्यता आहे.
वॉर्ड रचनेमुळे अनेकांचा हिरमोड
ग्रामपंचायतीच्या वॉर्ड रचनेमुळे काही भावी उमेदवारांच्या गोटात कही खुशी कही गम असे वातावरण आहे. गत कुर्हा ग्रामपंचयत निवडणूक पंचवार्षिकमध्ये सरपंच एस.सी.महिला राखीव असल्याने सरपंचपदी सुनीता मानकर यांना संधी मिळाली होती तर यावेळेस सरपंच पद आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) असल्याने सरपंच पदाची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. ग्रामपंचायतीच्या सहा प्रभागातून सतरा सदस्य आपले नशीब आजमावतील. येत्या सोमवार, 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्ग असल्याने अनेक दिग्गज सरपंच पदासाठी आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूक रींगणात उभे राहणार आहेत.


आमदारांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
मुक्ताईनगर तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील व विधान परीषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्या जवळचे कार्यकर्ते हे कुर्हा येथील असल्याने या दोन्ही आमदारांसाठी कुर्हा ग्रामपंचायतीची निवडणूक वर्चस्वाची लढाई ठरणार आहे.