श्रीकृष्ण हायस्कूसह महाराणा प्रताप विद्यालयाचा संघ विजयी
खो-खो स्पर्धा : भुसावळ शहरात 14 व 19 वर्ष वयोगटासाठी विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
भुसावळ : जळगाव क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती भुसावळ व बियाणी पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात श्रीकृष्ण हायस्कूल शिंदे व महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळचा संघ विजयी ठरला. या स्पर्धेचे उद्घाटन बियाणी पब्लिक स्कूलच्या संस्थेच्या सचिव डॉ.संगीता बियाणी यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची स्पर्धेला उपस्थिती
प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, भुसावळ तालुक्यातील क्रीडा समन्वयक बी.एन.पाटील, बियाणी स्कूलचे प्राचार्य रुद्रसेन घंटीया, विलास पाटील, राजू कुलकर्णी, ए.आर. राजपूत, जफर, प्रा.मनोज वारके यांच्यासह सर्व पंच खेळाडू, प्रशिक्षक उपस्थित होते.


महाराणा प्रताप विद्यालयाचा संघ विजयी
स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील सामना महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ विरुद्ध बियाणी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघात झाला. त्यात महाराणा प्रताप विद्यालयाचा संघ तीन गुणांनी विजयी झाला. सतरा वर्षे वयोगटातील अंतिम सामना बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ विरुद्ध श्रीकृष्ण हायस्कूल, शिंदी यांच्यात होवून शिंदी हायस्कूलचा संघ 30 गुणांनी विजयी झाला. 19 वर्षे वयोगटातील स्पर्धेत नाहाटा कॉलेज, भुसावळ विरुद्ध बियाणी ज्यूनियर कॉलेज, भुसावळ यांच्यात सामना रंगला. त्यात बियाणी कॉलेज विजयी झाले. 14 वर्षे वयोगट मुलींच्या सामन्यांमध्ये अहिल्यादेवी विद्यालय विरुद्ध डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात सामना होवून अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचा संघ सात गुणांनी विजयी झाला. मुलींच्या सतरा वर्षे वयोगटात श्रीकृष्ण हायस्कूल, शिंदी विरुद्ध अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ यांच्यातील अंतिम सामन्यात शिंदीतील संघाने नऊ गुणांनी बाजी मारली. मुलींच्या 19 वर्षे वयोगटाच्या सामन्यांमध्ये अंतिम सामना बियाणी मिलिटरी स्कूलविरुद्ध बियाणी पब्लिक स्कूल यांच्यात होवून बियाणी मिलिटरी स्कूलचा संघ सात गुणांनी विजयी झाला.
स्पर्धा यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
पंच म्हणून विलास पाटील, नरेंद्र म्हस्के, राजू कुलकर्णी, बी.एन.पाटील, प्रदीप साखरे, आर.आर.धनगर, रमण भोळे, कांतीलाल कुलकर्णी, एस.टी. कोळी, वंदना ठोके आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी नरेंद्र म्हस्के, पराग पाटील, मुकेश मोरे, काशीराम बारेला व बियाणी स्कूल स्टॉफसह खेळाडूंनी सहकार्य केल्याचे तालुका समन्वयक बी.एन.पाटील कळवतात.