वढोदे येथील निष्कलंक धाम परीसरात समरसता महाकुंभाचे भूमिपूजन
धर्मध्वजाचे अनावरण : समाजातील जाती भेदाच्या भिंती तुटण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन
फैजपूर : समाजात आनंद निर्माण व्हावा, सर्व भेदांच्या भिंती तोडून एकरूप व्हावे, माणूस म्हणून आपण एकत्री यावे, सर्व समाज सर्वसमावेशक असावा या उद्देशाने वढोदे येथील निष्कलंक धाम परीसरात 29 ते 31 दरम्यान समरसता महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. समरसता महाकुंभाचे भूमिपूजन गुरुवारी महामंडलेश्वर प.पू. जनार्दन महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सर्वांनी निमंत्रीत न राहता आपला कार्यक्रम समजून स्वयंस्फूर्तीने सर्वांनी समरसता महाकुंभाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रसंगी जनार्दन महाराजांनी केले.
भगव्या ध्वजाचे अनावरण
वढोदे येथील निष्कलंक धाम परीसरात 29, 30, 31 डिसेंबर 2022 रोजी सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट, फैजपूर व अखिल भारतीय सनातन सतपंथ परीवार आयोजित समरसता महाकुंभाची तयारी प्रगतीपथावर आहे. गुरुवार, 15 डिसेंबर 22 रोजी सकाळी 10 वाजता निष्कलंक धाम येथे समरसता महाकुंभाचे भूमिपूजन तसेच समरसता ध्वजाचा रंग एका संप्रदायाचा न देता विविधतेत एकता असलेल्या अशा भगव्या रंगाच्या धर्म ध्वजाचे अनावरण संतांच्या उपस्थित करण्यात आले.

मानवास महामानव बनविण्यासाठी ‘महाकुंभ’
हृदयात समरसतेचा भाव असल्यास सर्व समाज एकत्र होतो. मानवास महामानव बनविण्यासाठी हा महाकुंभ आहे. एकात्मता निर्माण करण्यासाठी ही सर्जनात्मक कृती प.पू. जनार्दन हरीजी महाराज यांनी हाती घेतली असल्याचे स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री भक्ती प्रकाशदासजी महाराज यांनी सांगितले. सर्वांप्रती सामाजिक दृष्टिकोन असलेले परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांनी सामाजिक एकात्मतेसाठी या महाकुंभाचे आयोजन केले ही आपणा सर्वांसाठी भाग्याची बाब आहे. धर्मामुळे समाजात शांती निर्माण होते त्यासाठी गुरु मार्गदर्शन करतात तेव्हा त्यांच्या शब्दांना प्रमाण मानून आपण तन-मन-धनाने समर्पित वृत्तीने सर्वांनी सहभाग द्यावा, असे आवाहन करून या आयोजनासाठी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार शिरीष चौधरी म्हणाले. यावेळी रा.स्व.संघ पश्चिम क्षेत्र सदस्य निलेश गद्रे यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित संतांचा सत्कार मुखी श्री कांतिभाई पटेल व राजुभाई पटेल नाशिक यांनी यावेळी केला.
गीताचेही अनावरण
कार्यक्रमात समरसता महाकुंभ है…भारत का गुणगान हैं… वो माता का सन्मान हैं…! हे सौ. सुचिता श्रीकांत रत्नपारखी यांनी तयार केलेली रचना व गायन व कु. राजेश्वरी, ज्ञानेश्वरी श्रीकांत रत्नपारखी यांनी बासरी, संगीत, कोरस दिलेले गीत उपस्थित मान्यवरांचे अनावरण केले. त्याचप्रमाणे देणगी पावत्या न छापता समरसता महाकुंभ स्मृती कुपनाचे ही अनावरण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी प.पू. सुरेशशास्त्री मानेकर बाबा (सावदा), प.पू.श्याम चैतन्यजी महाराज (जामनेर), प.पू.स.शास्त्री भक्तीप्रकाशदासजी, प.पू.शास्त्री भक्तीकिशोर दासजी, हभप मधुकर महाराज (खानापूर), हभप रवींद्र महाराज हरणे, हभप उद्धव महाराज, हभप नितीन महाराज, आमदार शिरीष चौधरी, रा.स्वं.संघ पश्चिम क्षेत्र कार्यकारीणी सदस्य निलेश चंद्रकांत गद्रे (भुसावळ), सामाजिक सभासद प्रमुख प्रमोद दांडगे, ब्रम्हकुमारी मिरादीदी, मसाका माजी चेअरमन शरद महाजन, माजी मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, डॉ.केतकी पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, हभप प्रवीणदास महाराज, पवनदास महाराज, पूज्य राममनोहरदास महाराज, हभप धनराज महाराज (अंजाळे), प्रांताधिकारी कैलास कडलग, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर आदींची उपस्थिती होती.