भुसावळ तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी 76.55 मतदान
पुरूष मतदारांच्या जवळपास महिला मतदारांचे मतदान : मोंढाळ्यात एका केंद्रावर 93.18 टक्के मतदान
76.55 Polling For Six Gram Panchayats in Bhusawal Taluka भुसावळ : तालुक्यातील सहा गावांच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी मतदान झाले. यात 76. 55 टक्के मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान असलेल्या गावांमध्ये सकाळपासून उमेदवार यांचे समर्थक कार्यकर्ते यांच्यात अधिक उत्साह जाणवत होता. ओझरखेडा, तळवेल, कन्हाळे बुद्रूक येथे काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या तर काही मतदान केद्रावर शांतता दिसत होती. गावांगावांमध्ये सकाळपासून उत्साह होता. पुरूष मतदारांच्या जवळपास महिला मतदारांनी सुध्दा मतदानाचा हक्क बजाविला आहे.
मोंढाळेत सर्वाधिक मतदान
सहा ग्रामपंचायतीत मोढाळे येथे प्रभाग तीन मध्ये सर्वाधिक म्हणजे 93.18 टक्के मतदान झाले आहे तर तळवेल येथील प्रभाग तीनमध्ये सर्वात कमी 67.5 टक्के मतदान झाले. तालुक्यातील ओझरखेडा, तळवेल, मोंढाळा, पिंपळगाव खुर्द, कन्हाळे बुद्रूक, कन्हाळे खुर्द या सहा ग्रामपंचायतीच्या सहा सरपंच व 52 सदस्यांसाठी रविवारी सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला. पोलिसांचे भरारी पथक नेमले होते. पोलिसांनी संवेदनशील असलेल्या कन्हाळे बुद्रुक या ठिकाणी जास्तीची पोलिसांचा अतिरीक्त बंदोबस्त होता. तळवेल, ओझरखेडा, कन्हाळे खुर्द या ठिकाणी मतदानासाठी सकाळपासून मतदारांच्या रांगा होत्या.

उद्या मतमोजणी
सायंकाळी सातपर्यत येथील तहसील कार्यालयात मतदान यंत्रे व अन्य साहित्य वाहनांद्वारे जमा करण्यात आले. आता मंगळवार, 20 रोजी मतमोजणी होणार आहे. त्याचे नियोजन महसूल विभागातर्फे सोमवारी केले जाणार आहे.
तहसीलदार यांची मतदान केद्रांना भेट
तालुक्यातील सहाही मतदान होत असलेल्या गावांना तहसीलदार दिपक धिवरे यांनी भेटी देऊन परीस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन तेथील मतदानांची माहिती घेतली, काही अडचणी आहे का हे जाणून घेतले. कुठेही अनुचितप्रकार घडू नये यासाठी सर्व मतदान केद्रावर पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.
असे झाले मतदान
सहा ग्रामपंचायतीसाठी रविवारी झालेल्या मतदानात 11 हजार 964 मतदारांपैकी 9 हजार 159 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला, त्यात 4 हजार 318 महिला तर 4 हजार 841 पुरूष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. महिलांचे सुध्दा अधीक मतदान झाले आहे.