यावल तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी 79.67 टक्के मतदान


यावल : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 79.67 टक्के मतदान झाले. सात लोकनियुक्त सरपंच व 52 सदस्य पदासाठी सदरचे मतदान झाले. सर्वच ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मंगळवारी तहसील कार्यालयात मतमोजणी केली जाणार आहे.

सरपंच पदासाठी 28 उमेदवार रींगणात
यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक, कासारखेडा, न्हावी, चुंचाळे, पिळोदा बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द व चितोडा या आठ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक होती. यामध्ये विरोदा बुद्रुक वगळता उर्वरीत सात ग्रामपंचायतमध्ये लोकनियुक्त सरपंचसाठी 28 उमेदवार रींगणात आहेत तर सदस्य पदाच्या 52 जागेसाठी 136 उमेदवार रींगणात आहेत. या सर्व आठ ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी 21 हजार 026 मतदारांपैकी 16 हजार 750 मतदारांनी मतदान केले. तालुक्यात एकूण मतदान 79.67 टक्के मतदान झाले. यात चिखली बुद्रुक, पिळोदे बुद्रुक व पाडळसा या तीन ग्रामपंचायतीत 5.30 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी हनफ तडवी, बबीता चौधरी, एस.एल.पाटील, सचिन जगताप, एन.पी.वैराळकर, एम.पी.देवरे, शेखर तडवीसह कर्मचारी यांनी मतदान प्रक्रीया पार पाडली.

पाडळसे येथे कर्तव्यदक्ष नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क 
पाडळसे येथील अमोल प्रभाकर प्रजापती यांनी लग्नाच्या घाई गडबडीत सुद्धा आज पाडळसे येथे मतदानाचा हक्क बजावला. व त्यानंतर ते लग्नासाठी रवाना झाले. मतदान करतेवेळी पाडळसे निवडणूक निर्णय अधिकारी सौ बबीता चौधरी मॅडम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण सूर्यवंशी तसेच पाडळसे पोलीस पाटील सुरेश खैरनार, कोतवाल प्रवीण बोरणारे, ग्रामपंचायत शिपाई लक्ष्मण बराटे आदी जण उपस्थित होते.

गाव निहाय मतदान असे

न्हावी :- 8 हजार 264 पैकी 7 हजार 521 मतदान – 77.44 टक्के
चुंचाळे :- 2 हजार 192 पैकी 1 हजार 828 मतदान – 82.96 टक्के
पाडळसे :- 4 हजार 548 पैकी 3 हजार 623 मतदान – 79.83 टक्के
चिखली खुर्द :- एकुण मतदान 728 पैकी 549 मतदान – 75.72 टक्के
चिखली बुद्रुक :- एकुण मतदान 973 पैकी 822 मतदान – 84.48 टक्के
कासारखेडा :- 1 हजार 021 पैकी 832 मतदान – 81.48 टक्के
चितोडा :- 1 हजार 337 पैकी 1 हजार 142 मतदान – 85.07 टक्के
पिळोदा बुद्रुक :- एकुण मतदान 538 पैकी 424 मतदान – 78.81 टक्के


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !