राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफांकडे ईडीची छापेमारी
ED raids on senior NCP leader MLA Hasan Mushrif कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी बुधवारी ईडीने छापेमारी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई अत्यंत चुकीची व निषेधार्ह असल्याची टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली.
हे तर अतिशय गलिच्छ राजकारण : मुश्रीफ
एका व्हिडिओच्या माध्यमातून मुश्रीफांनी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं. तसेच, एका विशिष्ठ जाती-धर्माच्या व्यक्तींवरच कारवाई होतेय का? असा प्रश्नही उपस्थित केला. वास्तविक 30 ते 35 वर्षातील माझं सार्वजनिक क्षेत्रातील जीवन आहे, यापूर्वीही 2 वर्षांपूर्वी ईडीने माझ्याकडे तपासणी केली होती, तेव्हाही काही सापडलं नाही. 4 दिवसांपूर्वीच कागल तालुक्यातील भाजपचे नेते दिल्लीत चकरा मारुन माझ्याबद्दल तक्रारी करत होते. तसेच, माझ्यावर ईडीची कारवाई होणार असल्याचंही ते सांगत होते. अशाप्रकारे नाउमेद करण्याचं काम जे चाललंय, ते अतिशय गलिच्छ राजकारण असल्याचं ते म्हणाले.

26 अधिकार्यांकडून झाडाझडती
मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी आज पहाटे ईडीने छापा टाकला. सुमारे 26 अधिकार्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू आहे. दरम्यान, ईडीच्या छापेमारीची बातमी सर्वत्र होताच नागरिकांनी मुश्रीफांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. संतप्त कार्यकर्त्यांची यावेळी पोलिसांशी बाचाबाची देखील झाली. गडहिंग्लज, कागल, मुरगूडमध्ये बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र मुश्रीफांनी सर्व व्यवहार सुरू ठेवण्याचे नागरीकांनी आवाहन केले.