गर्भवती महिलेचा जाळून खून ; मोहाडीनगर पोलिसांकडून खुनाची उकल : जामखेडची चौकडी जाळ्यात

जामखेड कला केंद्रातील वादातून महिलेचा खून : सहा आरोपी निष्पन्न


धुळे (रविवार, 27 सप्टेंबर2026) : मोहाडीनगर पोलीस ठाणे हद्दीतील जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवत पोलिसांनी हा प्रकार खुनाचा असल्याची उकल अवघ्या तीन दिवसात केली. अंतर्गत वादातून महिलेची हत्या करीत तिला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून सहा आरोपींना निष्पन्न करीत पोलिसांनी चौकडीला बेड्या ठोकल्या आहेत. पिंकी हनुमंत काटकर (31, आदिवासी वाडी, खरबाची वाडी, चिंचवलीतर्फे आतोने, रायगड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

चौकडी पोलिसांच्या जाळ्यात
गर्भवती महिलेच्या खून प्रकरणी जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रातून चालक सर्फराज उर्फ शफीक अलीम मोमीन (38, कळंब, जि.धाराधिव), चालक आरीफ उर्फ खुज्या आसीफ शेख (31ख इंदिरानगर, कळंब), स्वाती उर्फ आरती गणेश कुर्‍हाडे (28, जामखेड) आणि लक्ष्मी बालाजी पवार (30, कळंब) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने 1 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, फारुक शेख व रोहिणी जाधव (जालना रोड, छत्रपती संभाजीनगर) हे संशयीत पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

तीन दिवसात खुनाची उकल
नरव्हाळ, ता.जि.धुळे शिवारातील गरताडबारी घाट परिसरातील वनक्षेत्रात एका अनोळखी गर्भवती महिलेवर पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना 22 रोजी उघडकीस आली होती. मयत महिलेची ओळख तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी महामार्गावरील सलग 11 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून हुंडाई मोबिलिओ वाहन क्रमांक (एम.एच.43 ए.आर.4070) संशयित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांचे पथक जामखेड येथे रवाना झाले.

कला केंद्रातील अंतर्गत वादातून खून
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीतून मयत महिलेची ओळख पिंकी हनुमंत काटकर (31) अशी निष्पन्न झाली. कला केंद्रातील एकमेकांशी असलेल्या अंतर्गत वादातून सर्व आरोपींनी पिंकीला बेदम मारहाण केली व ती बेशुद्ध झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह वाहनातून घेऊन राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरू केला. धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ शिवारातील गरताडबारी घाट परिसरात निर्जन ठिकाणी संशयीत थांबले व त्यांनी पिंकीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळले. दरम्यान, अटकेतील सर्फराज उर्फ शफीक अलीम मोमीन याच्याविरुद्ध धाराशिव आणि बीड जिल्ह्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, उपनिरीक्षक अशोक पायमोडे, अंमलदार निलेश पाटील, राहुल पाटील, प्रेमराज पाटील, ललिता मराठे, रजनी नाईक, बापूजी पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !