भुसावळातील थकबाकीदारांच्या 20 गाळ्यांना पालिकेने ठोकले सील

हॉटेलसह मोबाईल टॉवरही सील : पालिकेच्या मोहिमेने थकबाकीदार धास्तावले : अतिक्रमणावर फिरवला जेसीबी ; पहिल्याच दिवशी 20 लाखांचा कर वसूल


The municipality sealed 20 cases of defaulters in Bhusawal भुसावळ : पालिका कराची थकबाकी भरण्याकडे वर्षानुवर्षे कानाडोळा करणार्‍या थकबाकीदारांविरोधात भुसावळ पालिकेने बुधवारपासून मोहिम उघडताच शहरातील थकबाकीदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. पहिल्याच दिवशी सुमारे 25 दुकानांसह एक हॉटेल व मोबाईल टॉवरला सील ठोकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर पुन्हा रस्त्यावर टपर्‍या घेवून व्यवसाय थाटणार्‍यांविरोधात प्रशासकांनी कारवाईचा दंडुका उचलल्याने अतिक्रमण धारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. महात्मा गांधी पुतळा व यावल रोड परीसरात मोहिमेमुळे व्यावसायीकांनी दुकानेच लावली नाही तर काहींनी टपर्‍या थाटल्याने त्यावर जेसीबी फिरवण्यात आला.

कारवाईने थकबाकीदारांच्या गोटात खळबळ
भुसावळ पालिकेला पहिल्या टप्यात 228 मालमत्ता धारकांकडे पाच कोटी 58 लाख 13 हजार 552 रुपयांची थकबाकी वसुल करायची आहे. वर्षानुवर्षे थकबाकी भरली जात नसल्याने हा आकडा फुगतच चालल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट होवून शहराच्या विकासावर त्यामुळे परीणाम होत आहे. प्रांताधिकारी तथा पालिकेेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी पालिकेची गंगाजळी वाढवण्यासाठी एक लाखांवर थकबाकी असलेल्या 228 मालमत्ता व गाळेधारकांची यादी तयार करीत त्यांच्याविरोधात बुधवारपासून धडक मोहिम उघडली आहे. थकबाकी जागेवर भरा अन्यथा मालमत्ता सील होईल, असा इशारा दिल्यानंतरही त्याचा परीणाम न झाल्याने बुधवारी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सुमारे 25 दुकाने, एक हॉटेल, एक मोबाईल टॉवर सील करण्यात आले तर सुमारे 10 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी 11 वाजेपूर्वी जमा झाली तर कर वसुली करतांना 10 लाखांची कर वसुली झाल्याचे सूत्रांनी सांगितले.


अतिक्रमणावरही फिरवला जेसीबी
पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात 50 कर्मचारी तसेच पालिकेचे विविध विभागाचे अभियंता व उपमुख्याधिकारी लोकेश ढाके आदींनी थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यास बुधवारी सकाळी 11 वाजेनंतर यावल रोडपासून सुरूवात केली. यावेळी अतिक्रमणावरही जेसीबी फिरवण्यात आला. मोहिमेवेळी अतिक्रमण दिसताच ते हटवण्यासाठी पालिकेचे दोन ट्रॅक्टर जेसीबी सज्ज ठेवण्यात आले. कारवाईच्या धास्तीने यावल रोडवर अतिक्रमण धारकांनी टपर्‍या, लोटगाड्या लावल्या नाही तर ज्यांनी लावल्या त्यांनी पथक येत असल्याचे दिसताच घरचा रस्ता धरला. यावेळी महात्मा गांधी पुतळ्याचा परीसर मोकळा करण्यात आला तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर ठेवलेल्या टपर्‍या नष्ट करण्यात आल्या तर अतिक्रमण केलेले साहित्य जप्त करण्यात आले.

हॉटेलसह मोबाईल टॉवरला ठोकले सील
टेक्निकल हायस्कूलसमोरील व्यापारी संकुलातील दोन दुकानांना पथकाने सील लावले तर दगडी पुलाजवळील मोबाईल टॉवरला सील लावण्यात आले तसेच जामनेर रोडवरील रंगोली हॉटेलचे टेरेसही थकबाकीपोटी सील केल्याचे उपमुख्याधिकारी ढाके यांनी सांगितले. खडका रोड परीसरात रात्री उशिरापर्यंत दुकाने सील करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, भुसावळ बसस्थानकाकडे 60 लाख 78 हजार 911 रुपये तसेच पोलिस प्रशासनाकडे 11 लाख 99 हजार 360 रुपयांची थकबाकी तसेच चितोडे वाणी समाज मंदिराकडे आठ लाखांची थकबाकी आहे तसेच अनेक कार्यालये, शाळा, व्यापारी यांच्याकडे लाखोंची थकबाकी आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !