तामसवाडी ग्रामपंचायतीचा लाचखोर ग्रामसेवक धुळे एसीबीच्या जाळ्यात
ग्रामपंचायतीचा ठराव देण्यासाठी मागितली 80 हजारांची लाच
धुळे : शासकीय ठेकेदाराने काँक्रिट बंधारा बांधल्यानंतर बिल मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव देण्याच्या मोबदल्यात तब्बल 80 हजारांची लाच स्वीकारणार्या ग्रुप ग्रामपंचायत तामसवाडीचा लाचखोर ग्रामसेवक प्रल्हाद बळीराम माळी (50, रा.अशोक नगर वलवाडी, धुळे) यास शनिवारी दुपारी धुळे एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईने ग्रामपंचायतीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सुटीचा दिवस पाहून स्वीकारली लाच
धुळ्यातील सुयोग नगरातील 28 वर्षीय तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी बांधलेल्या काँक्रिटी बंधार्याचे बिल मिळण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव देण्याच्या मोबदल्यात आरोपी ग्रामसेवक प्रल्हाद माळी यांनी 28 रोजी 80 हजारांची लाच मागितली व तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली. सुटीचा दिवस असल्याने एसीबी ट्रॅप करणार व आपण पकडले जाणार नाही या धुंदीत ग्रामसेवक असल्याने त्यांनी देवपूर पश्चिम पोलिस ठाणे हद्दीत पाटील कॉलनी परीसरात कंत्राटदाराला लाच देण्यासाठी बोलावले व याचवेळी पथकाने आरोपीने लाच स्वीकारताच त्याच्या मुसक्या आवळल्या.
यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे, जयंत साळवे, भूषण खलाणेकर, भुषण शेटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

