पळासखेड्यात तरुणाचा खून : आरोपीला पहाटेच्या सुमारास पारोळा पोलिसांकडून अटक
पारोळा (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : जुन्या भांडणाच्या रागातून 18 वर्षीय तरुणाची ऐन पोळा सणाच्या दिवशीच हत्या झाल्याची धक्कादायक व मन हेलावणारी घटना पारोळा तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक शिवारात गुरुवार, 10 रोजी दुपारी घडली होती. या घटनेत मयूर दुर्वास पाटील (18) या तरुणाचा खून झाला होता तर संशयीत अंकुश नेहरू पाटील हा पसार झाल्यानंतर त्याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
जुन्या वादातून तरुणाची हत्या
मयत मयूर दुर्वास पाटील व संशयीत अंकुश नेहरू पाटील हे एकाच भागात राहणारे असून त्यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. याच जुन्या वादाच्या कारणावरून गुरुवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या सुमारास पळासखेडा शिवारातील रवींद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपी अंकुश पाटील याने त्याच्या पॅन्टच्या डाव्या खिशातून चाकू काढून मयूर पाटील याच्या पोटात वार केला. वार वर्मी बसल्याने मयूर गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला.
संशयीताविरोधात खुनाचा गुन्हा
खून प्रकरणी मयत मयूरचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील (45, रा. पळसखेडे बु.॥ ता.पारोळा) यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खुनानंतर संशयीत अंकुश नेहरू पाटील हा पसार झाल्यानंतर त्याचा ठावठिकाणा कळताच शुक्रवारी पहाटे तयाला अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.

