जळगावातील सेवानिवृत्ताला बोलण्यात गुंतवत हायप्रोफाईल भामट्यांनी दिड लाखांची अंगठी लांबवली
जळगाव (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : भोलेनाथ का मंदिर का है? विचारत आलिशान कारमधून आलेल्या दोन सुटा-बुटातील भामट्यांनी सेवानिवृत्ताला बोलण्यात गुंतवत त्यांच्या हातातील दिड लाख रुपये किंमतीची व सुमारे 10 ग्रॅम वजनाची अंगठी लांबवली. या प्रकरणी जळगावातील रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले जळगावात ?
जळगावातील दिलीप बाबूराव सुरवाडे (66, गिरणा पंपिंग रोड, जळगाव) हे सेवानिवृत्त कर्मचारी असून 9 रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते पायी फिरायला निघाल्यानंतर एका विना क्रमांकाच्या पांढर्या रंगाच्या मारोती सुझूकी कंपनीच्या कारमधून दोन संशयीत उतरले व त्यांनी भोलेनाथ का मंदिर का है? असे हिंदीतून विचारत सुरवाडे यांच्याशी संवाद साधायला सुरूवात केली. काही वेळ संवादानंतर संशयीतांनी अलगद सुरवाडे यांच्या हातातील दहा ग्रॅम वजनाची व पुष्कराज खडा असलेली अंगठी गायब केली.
संशयीत गेल्यानंतर तक्रारदाराला आपली फसवूणक झाल्याचे लक्षात आले. तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मधुकर शेलार करीत आहेत.

