भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याचे खून प्रकरण : बेसावध असतानाच आरोपीने पाठीमागून चाकूने केले अनेक वार


भुसावळ (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : भुसावळातील रेल्वेत कॅन्टीन कर्मचारी असलेल्या 36 वर्षीय तरुणाच्या हत्येने जंक्शन पुन्हा हादरले आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांमध्ये वाढलेला अल्पवयीनांचा सहभाग हादेखील मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. रेल्वे कर्मचारी असलेल्या तुषार गोविंद सोनवणे (36, रा. श्रावस्तीनगर, भुसावळ) या तरुणाची शहरातीलच एका भागातील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीनाने पाटीलमळा भागात चाकूचे वार करीत हत्या केल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयिताने मयत तुषारला गुरुवारी सायंकाळी स्वतः फोन केला व वडील नाशिकला गेल्याचे सांगितले मात्र गाडी नसल्याने तुषारने घेण्यासाठी बोलावल्यानंतर संशयीत दुचाकी (एम.एच.19 सी.एच.1405) वरून त्यास घेण्यासाठी आला व दोघे घराकडे निघाल्यानंतर संशयीताने तुषारला गाडी चालवण्यासाठी दिली व तो पाठीमागे बसला. तुषार बेसावध असतानाच पाटील मळ्याजवळ संशयीताने सोबत आणलेल्या धारदार चाकूने डोक्यामागे व पाठीमागे सपासप चाकूचे वार केले. या हल्ल्यात तुषारच्या डोक्याला, कपाळाला तसेच पाठीमागील भागावर गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनास्थळीच झाला मृत्यू
बेशुद्धावस्थेतील तुषारला रुग्णवाहिकेतून भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असता तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

काही दिवसांपूर्वीच रचला कट
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीने काही दिवसांपूर्वीच या हत्येचा कट रचला होता. आईसोबत तुषारचे मैत्री पूर्ण संबंध असल्याचा संशय अल्पवयीनाच्या डोक्यात होता व त्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा रजिस्टर क्रमांक 447/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तायडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !