भुसावळातील एलएचबी कोच फॅक्टरी रद्द : स्थानिकांचा रोजगार हिरावला


प्रा.धीरज पाटील : रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी अतिक्रमण धारकांची केली फसवणूक

भुासावळ : शहरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवून तेथे 472 कोटी रुपये खर्चाचा एलएचबी कोचेसचा कारखाना येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले होते मात्र भुसावळ भेटीवर आलेल्या रेल्वे जी.एम.संजीव मित्तल यांनी भुसावळात एलएचबी कोच कारखान्याला मान्यता मिळाली नसल्याचे सांगत येथे मेमू ट्रेन सेक्शन (मेन्टेनन्स सेक्शन) ला मंजुरी मिळाल्याची माहिती दिल्याने भुसावळातील सुमारे दोन हजार स्थानिकांच्या हातांना रोजगार मिळण्याचे स्वप्न भंगले आहे तर रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी एक प्रकारे अतिक्रमण धारकांची ही फसवणूक केली असल्याचे पत्रक शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. दरम्यान, शहरात अतिक्रमण काढताना विस्थापीत झालेल्या नागरीकांना हक्काचे घरकुल मिळण्यासाठी शिवसेना लढा देणार असल्याचेही त्यांनी कळवले आहे.

कारखान्यासाठी भर थंडित काढले अतिक्रमण
नागपूरला जाणारा प्रकल्प भुसावळात येत असल्याचे सांगून तेथे 507 कोटी 64 लाख रुपये खर्च होत असताना भुसावळात मात्र रेल्वेची स्वतःची मोठी जमीन उपलब्ध असल्याने 472 कोटींचा खर्च येणार असल्याचे त्यावेळी रेल्वे प्रशासनाने सांगितले होते. शिवाय या प्रकल्पासाठी 800 घरांचे अतिक्रमण काढुन 10 हजार नागरीकांना भर थंडित बेघर करण्यात आले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला तर त्यासाठी अनेक आंदोलने उपोषणे झालीच त्यासोबतच न्यायालयीन संघर्ष सुद्धा झाला. आपल्या गोर-गरीब मुलांच्या हाताला काम मिळेल म्हणून नागरीकांनी अतिक्रमण हटाव मोहिमेला समर्थन दिले परंतु आता भुसावळात 120 कोटी रुपयांचा मेमू कारशेड दुरुस्ती कारखाना होणार असल्याने महत्वाकांक्षी एलएचबी कोच फॅक्टरीचा प्रकल्प गुंडाळला गेल्याने भुसावळ परीसराच्या विकासात अडथळे आणण्याचा हा राजकीय डावपेच सुद्धा असू शकतो, अशी शंका प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केली आहे.




अतिक्रमण काढण्याच्या उद्देशालाच हरताळ
रेल्वे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी अतिक्रमणग्रस्त नागरिकांची एक प्रकारे फसवणूक केली असून केंद्र सरकारच्या विविध योजना भुसावळात आता फेल ठरत आहे. अतिक्रमण निघालेल्या नागरीकांना पुनर्वसनाचे लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन सुद्धा आज हवेत विरले आहे. यामुळे अतिक्रमण काढण्याचा मुळ उद्देशच बारगळला आहे तसेच या वस्त्यांमधील अनेक गोरगरीब ज्यांना कमाईचे साधन कमी आहे, अशी मंडळी उघड्यावर आली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यासाठी जबाबदार आहे, अशी भावना आता जनसामान्यांच्या मनात घर करून बसली आहे. केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाचे हे अपयश असून भुसावळ परीसरात सुरू असलेल्या अनेक योजना सुद्धा बंद झाल्या असल्याचे पत्रकात नमूद आहे.

शिवसेनेचा आता बेघरांना घर मिळण्यासाठी लढा
केंद्र सरकार घरासह रोजगार देण्याच्या वल्गना हवेत विरल्या असून आता तर आहे घरही गेले असून मिळणारा रोजगारही हिरावला गेला आहे. शहरासाठी प्रस्तावित असलेल्या पाच हजार घरकुलांमधून या बेघरवासीयांना लाभ मिळवून देण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, महिला आघाडी जिल्हा संघटिका पूनम बर्‍हाटे, तालुका संघटीका भुराबाई चव्हाण, शिक्षकसेना जिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, तालुका प्रमुख अतुल शेटे, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख श्याम श्रीगोंदेकर, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख, ग्रा.क.तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, ग्रा.क. शहर प्रमुख मनोज पवार, दिव्यांग सेना तालुका प्रमुख फिरोज तडवी, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण पाटील, तालुका प्रमुख हेमंत बर्‍हाटे, शहर प्रमुख सुरज पाटील, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर व पदाधिकारी प्रयत्न करणार असल्याचे कळवण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !