दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अकलूदच्या इसमाचा अखेर मृत्यू
पोलिसांची धाव सखोल शवविच्छेदनाअंती मृत्यूचे कारण होणार स्पष्ट
Isma of Aklud, who attempted suicide twice, finally died यावल : तालुक्यातील अकलूद येथील एका 56 प्रौढाचा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या इसमाने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र त्यांना वाचवण्यात यश आले होते. प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. काशीनाथ विश्वनाथ पाटील (56) असे मयताचे नाव आहे.
गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला मृतदेह
अकलूद, ता. यावल येथील दीपक काशिनाथ पाटील यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार, त्यांचे वडील काशिनाथ विश्वनाथ पाटील हे भुसावळ रेल्वेमध्ये नोकरीला होते व त्यांच्या हातापायाला विविध प्रकारची एलर्जी होत होती. गेल्या काही दिवसापासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते व त्यांनी मागील आठवड्यात भुसावळ येथील पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र सहकारी कर्मचार्यांनी त्यांना वाचवले व त्यानंतर त्यांनी तापी पुलावरून उडी घेण्याचा देखील प्रयत्न केला होता तेथून देखील त्यांना वाचवण्यात आले. दरम्यान, सोमवारी त्यांनी एका खिडकीच्या असारीला रुमाल बांधून गळफास घेतल्याचे दिसताच दरवाजा तोडून आत पाहिले असता गळ्यात गळफास घेतलेल्या रुमालासह त्यांच्या शर्टवर रक्ताचे डाग दिसले व त्यांचा गळा कापलेला दिसून आला. तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर प्राथमिक तपासणी करून मृतदेह सुक्ष्म शव विच्छेदनासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आला. त्यांनी आत्महत्या केली की काही घातपात आहे याबद्दल कुटुंबांना संशय असल्याने सखोल शव विच्छेदन केले जाणार असल्याची माहिती फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी दिली.