अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन तरुणीचा गर्भपातानंतर मृत्यू : साक्री तालुक्यातील घटना
धुळ्यातील पसार नर्सचा पोलिसांकडून कसून शोध : तरुणाला अटक
Minor girl who became pregnant due to abuse dies after abortion : incident in Sakri taluka धुळे : पिंपळनेर शहराजवळील एका गावाजवळील अल्पवयीन तरुणीवर एकाने अत्याचार केल्याने तरुणी गरोदर राहिली मात्र बदनामी टाळण्यासाठी धुळ्यातील एका खाजगी रुग्णालयात एका नर्सच्या माध्यमातून गर्भपात करण्यात आला मात्र नंतर मुलीला घरी नेल्यानंतर तरुणीचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी अत्याचार करणार्या तरुणासह धुळ्यातील नर्सविरोधात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून या नर्सचा शोध सुरू करण्यात आला आहे.
लग्नाच्या आमिषाने केला अत्याचार
पिंपळनेर शहरापासून काही अंतरावरील एका गावातील अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार करण्यात आला. त्यातून पीडीता गरोदर राहिल्यानंतर तिला धुळ्यात आणल्यानंतर एका खाजगी रुग्णालयातील नर्सने पैसे घेत तिचा गर्भपात केला मात्र गर्भपात झाल्यावर घरी नेल्यावर मुलीचा अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी आता पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नर्स प्रमिला पवार व राज सिकलकर या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळनेर पोलिसांनी राज दीपक सिकलकर (20) यास अटक केली आहे तर नर्सचा शोध सुरू करण्यात आला आहे.
आरोपी तरुणाची कोठडीत रवानगी
एका गावातील पीडीतेच्या घराजवळील राज दीपक सिकलकर (20) या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्यानंतर त्यातून पीडीता गरोदर राहिली व ही माहिती कळताच तिला सोबत घेत आईने धुळे गाठले. शहरातील साक्री रोडवरील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या प्रमिला पवार यांनी पीडितेच्या कुटुंबीयांकडून 10 हजार रुपये घेत मुलीचा गर्भपात केला व त्यानंतर मुलीला पुन्हा गावी नेण्यात आले परंतु अती रक्तस्रावामुळे मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी धुळे शहर गाठत साक्री रोडवरील त्या रुग्णालयात तपासणी केली मात्र नर्स पवार या पसार झाल्याचे समोर आले आहे. संशयित राजला अटक करण्यात आली असून त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मयत तरुणीच्या पश्चात आई, दोन मोठ्या बहिणी व लहान भाऊ असा परीवार असून वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.