नालासोपारा स्फोटक प्रकरण : साकळीतील तरूणास साडेचार वर्षानंतर जामीन
राज्याच्या दहशतवादविरोधी पथक एटीएसने सप्टेंबर २०१८ मध्ये केली होती अटक
यावल : साकळी, ता.यावल (जि.जळगाव) येथुन सप्टेंबर २०१८ मध्ये विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी या तरूणास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासुन सदरील तरूण हा तुरूंगात होता तर आता सदर तरूणास मुंबई विशेष न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. तब्बल साडेचार वर्षांनी तरूणास जामीन मिळाला आहे.
साडेचार वर्षांनी तरूणास जामीन
१० ऑगस्ट २०१८ रोजी नालासोपारा येथे एटीएसने कारवाई करून २० जिवंत बॉम्ब व बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करीत वैभव सुभाष राऊत यास अटक केली होती तो सनातनचा साधक होता त्या नंतर राज्यभरात धाडसत्रात या स्फोटक प्रकरणात वैभव राऊत सह शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर व अविनाश पवार यांना अटक करण्यात आली होती तर यात दिनांक ६ सप्टेंबर साकळी ता. यावल येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास व दिनांक ७ सप्टेंबर गावातील लोधी वाड्यातील विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी या दोघांना अटक केली होती.या संशयीतांवर मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवण्याचा कट असे आरोप होते व तेव्हा पासुन साकळी गावातील दोघे तुरूंगात होते तर यातील विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी याने मुंबईच्या विशेष न्यायालयात जामीन करीता अर्ज दाखल केला होता संशयीताकडून ऍड. संजीव जी. पुनाळेकर, ऍड.रणजीत नायर आणि ऍड.सचिन कणसे यांनी न्यायालयात युक्तीवाद केला व ५० हजारांच्या एपतीचा दाखल सह सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.
