धक्कादायक : यावल शहरातील स्मशानभूमीतून अस्थींची चोरी
स्मशानभूमीत 24 तास सुरक्षा रक्षकाची मागणी ः दागिन्यांसाठी अस्थी चोरीचा संशय
Shocking: Ashes stolen from Yaval city crematorium यावल (7 जुलै 2026) : यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या मागील स्मशानभूमीत अग्नीडाग दिलेल्या मृतदेहाच्या अस्थी चोरीला गेल्याने संता व्यक्त होत आहे. दागिने शोधणार्या चोरट्यांनी दागिने शोधताना थेट मयत मृतदेहाच्या अस्थिदेखील येथून चोरी केल्याचा संशय आहे. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकाराने कुटुंबाच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी देखील असे प्रकार स्मशानभूमीत घडले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून 24 तास सुरक्षा रक्षक नेमला जावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
काय घडले यावल शहरात
शहरात श्री महर्षी व्यास मंदिराच्या मागे सार्वजनिक स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत रविवारी शहरात मयत झालेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाला अग्निडाग देण्यात आला व परंपरेनुसार सोमवारी सदर मयत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य तेथे राखेतून अस्थी एकत्रित करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले मात्र तेथे जागेवर राखचं नव्हती.
पालिकेने नेमावा सुरक्षा रक्षक
एकूणच काही भुरटे चोर स्मशानभूमीत अग्नीडाग दिलेल्या मृतदेहातील दागिने शोधण्यासाठी थेट अस्थीसह संपूर्ण राखच घेवून गेल्याचे दिसुन आले. संबंधित कुटुंबाला प्रचंड मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून येथील स्मशानभूमीत 24 तास सुरक्षा रक्षक नेमले जावे तसेच या संपूर्ण स्मशानभूमीला आजूबाजूंनी उंच कंपाउंड वॉल करून कुलूप बंद गेट लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.