भुसावळात रेल्वे व्यवसायाच्या वादातून तरुणावर गोळीबार : दोघांना अटक


Youth shot in Bhusawal following dispute over railway business; two arrested भुसावळ (7 जुलै 2026) : शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असतानाच 30 वर्षीय तरुणावर रेल्वे व्यवसायाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना राहुल नगरात सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत तरुण बचावला असून दोन्ही संशयीतांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रेल्वे व्यवसायाच्या व्यावसायीक वादातून गोळीबार
धरमसिंग उर्फ गोलू रायसिंग पंडित (30, राहुल नगर, बालाजी मंदिराजवळ, भुसावळ) हा तरुण सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घराजवळील वैभवी ट्रेडर्स या दुकानावर बसला असताना संशयीत अमोल विनोद देवरे (रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ) व अनिकेत कालू मनोज जाधव (वाल्मीक नगर, भुसावळ) हे दुचाकीवरून आले व अनिकेतने आपल्या जवळील गावठी कट्ट्याने दोन गोळ्या आपल्या दिशेने झाडल्या. सुदैवाने गोळी न लागल्याने तरुणाचे प्राण वाचले तर संशयीत घटननेनंतर पसार झाले. दरम्यान, जुन्या रेल्वेवरील व्यावसायीक वादातून दोघा संशयीतांनी ठार मारण्यााठी गोळीबार केल्याचे पंडित यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार पंडित यांच्याविरोधातही यापूर्वी गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


पोलीस अधिकार्‍यांची धाव
भुसावळात झालेल्या गोळीबारानंतर अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गोळीबाराची खातरजमा करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले व मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने दोन्ही आरोपींना मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. तपास एपीआय राहुल काळे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !