नेरमध्ये एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडले : सुदैवाने 53 लाखांची रोकड सुरक्षित
HDFC Bank ATM broken into in Ner : Fortunately cash worth Rs 53 lakhs safe धुळे : तालुक्यातील नेर येथील महामार्गावरच असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएमला चोरट्याने टार्गेट करीत फोडल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली मात्र सुदैवाने चोरट्याला कॅश ट्रे बाहेर काढता न आल्याने 53 लाखांची रोकड बचावली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याचा स्थानिक गुन्हे शाखेसह तालुका पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
पोलिस प्रशासनाने सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधलेला चोरटा आढळून आला असून दुचाकीवरील क्रमांकासह संशयीताच्या वर्णनाद्वारे चोरट्याचा कसून शोध सुरू करण्यात आला. शुक्रवारी गुड फ्रायडे, सेच दुसरा शनिवार व नंतर रविवारमुळे बँकेला सलग सुट्या आल्याने बँकेने गावातील ग्राहकांची गैरसोय टळण्यासाठी अलीकडेच या एटीएममध्ये मोठ्या प्रमाणावर रोकडचा भरणा केला होता मात्र सुदैवाने कॅश ट्रे न उघडल्याने 53 लाखांची रोकड बचावली अन्यथा बँकेचे नुकसान झाले असते हे स्पष्ट आहे.
पोलिस अधिकार्यांची धाव
अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. चोरट्याच्या शोधासाठी धुळे तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने संशयिताच्या वर्णनावरून शोध सुरू केला आहे.