भुसावळात शहरातील तरुणांवर गोळीबार : एका संशयीताला वरणगावातून अटक
डीवायएसपी यांच्या पथकाला तीन दिवसांच्या जागरणानंतर अखेर आले यश
Firing on city youth in Bhusawal : One suspect arrested from Varangaon भुसावळ : पूर्व वैमनस्यातून भुसावळातील दोघा तरुणांवर तीन संशयीतांनी गोळीबार केल्याची घटना साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ शुक्रवार, 14 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली होती. गोळीबारात अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (25, भुसावळ) हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते. गोळीबार प्रकरणी मुख्य संशयित करण संतोष सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यास रविवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने वरणगाव शहरातून अटक केली आहे.
गोळीबारानंतर संशयित पसार
अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (25, भुसावळ) व त्यांचे दोघे मित्र चारचाकी स्वीप्ट (एम.एच.19 डी.व्ही.0071) ने वरणगावकडे जेवणासाठी निघाल्यानंतर दुचाकीला कट लागल्यानंतर संशयितांनी जाब विचारल्यानंतर झालेल्या वादातून संशयित करण संतोष सपकाळे याने दोन गोळ्या झाडल्याने अक्षय व मंगेश जखमी झाले होते. या प्रकरणी करण सपकाळेसह संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन दिवसानंतर आले यश
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील, यासीन पिंजारी, रमण सुरळकर तसेच वरणगावचे सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या पथकाने करणला वरणगावातून अटक केली. डीवायएसपी वाघचौरे यांच्या पथकाने भुसावळ तालुक्यातील अनेक जंगलांमध्ये संशयीतांचा पाठलाग केला मात्र पथक येण्यापूर्वी संशयित निसटत होते मात्र अखेर वरणगावातून संशयीताच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले.
