यावलला नियमित पीक कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांचा सत्कार
यावल : कर्जांच्या परतफेडीचे योग्य नियोजन करीत शेतकरी वर्ग देखील आपली एक वेगळी पत बँकेत निर्माण करीत आहे. ही बाब कौतुकास्पद असुन अशा शेतकर्यांचा सन्मान करून बँकेने देखील शेतकरी वर्गाप्रतीचा आदर दाखवला आहे, असे प्रतिपादन यावलचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी केले. शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांच्या सन्मान कार्यक्रमात बोलत होते. शहरातील मुख्य रस्त्यावरील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचत झालेल्या कार्यक्रमात शेती पिकाकरीता घेतलेले कर्ज वेळेत अदा करणार्या शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी यावल नगरपरीषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते होते. प्रसंगी त्यांनी बँकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. नियमित पीक कर्ज परतफेड ही एक संस्कृती विकसीत व्हावी तसेच शासना मार्फतच्या व्याज सवलत योजना व प्रोत्साहनपर मोबदला यांची सर्वसामान्य शेतकर्यांना यावल शाखेचे शाखा व्यवस्थापक आर.बी.हिंगणेकर यांनी माहिती दिली. माजी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी देखील शेतकरी वर्गाकडून देखील घेतलेल्या कर्जाच्या परत फेडी करीता नियोजन केलेले असते मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे बर्याच वेळा शेतकर्यांचे नियोजन बिघडते, असे सांगितले. भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडेसह मान्यवरांच्या हस्ते नियमित पीककर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना सन्मानपत्र व पुष्पगच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन शाखेचे रोखपाल अविनाश सोनोने यांनी तर आभार शाखेचे अधिकारी मयूर पवार यांनी केले. नियोजन अधिकारी विक्रम धकाते, शाखेचे महेश खाचणे व भूषण महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
