भुसावळातील दोघा तरुणांवर गोळीबार : आरोपींकडून गावठी कट्ट्यासह दुचाकी जप्त
Shooting at two youths in Bhusawal : Two-wheeler seized from the accused along with a village knife भुसावळ : महामार्गावर दुचाकीला चारचाकीचा कट लागल्यानंतर कारण विचारण्याचा शाब्दीक वाद हाणामारीवर गेल्यानंतर त्रिकूटाने भुसावळातील दोघा तरुणांवर गोळीबार केला होता. शुक्रवारी रात्री 10 वाजता ही घटना साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ घडली होती. गोळीबार प्रकरणी भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने खडका येथील तिघा तरुणांना अटक केली होती. पोलीस कोठडी मिळाल्यानंतर संशयीतांच्या चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व गावठी कट्टा जंगलातून काढून दिल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
‘तो’ गोळीबार वैमनस्यातून नव्हे
अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (25, भुसावळ) हे दोन्ही तरुण अन्य दोघा मित्रांसह शुक्रवारी रात्री चारचाकी स्वीप्ट (एम.एच.19 डी.व्ही.0071) ने वरणगावकडे जेवणासाठी निघाल्यानंतर दुचाकीला कट लागल्यानंतर संशयितांनी जाब विचारला व त्यातून शाब्दीक वाद गुद्द्यावर पोहोचला. यावेळी संशयित करण संतोष सपकाळे याने कमरेला लावलेला कट्टा काढून दोन गोळ्या झाडल्याने अक्षय व मंगेश गंभीररीत्या जखमी झाले तर गोळीबारानंतर करण सपकाळेसह संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (खडका, ता.भुसावळ) हे संशयित पसार झाले होते. सुरूवातीला ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली असल्याची चर्चा होती मात्र संशयित व जमखींची विचारपूस केल्यानंतर वाहनाला कट मारण्यातून ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.
तीनही संशयितांना आठ दिवसांची पोलीस कोठडी
सुरूवातीला संशयित करण हा वरणगावच्या सानवी हॉटेलजवळ आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली तर संतोष व जीवन हे कंडारीतील भिलवाडी पलॉट एरीया भागातील नातेवाईकांच्या घरी आल्यानंतर सोमवारी मध्यरात्री एक वाजता त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील, यासीन पिंजारी, रमण सुरळकर यांनी केली. दरम्यान, संशयीताना सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.
