भुसावळातील 12 हजारांचे लाच प्रकरण : लाचखोर कोतवालासह पंटराला दोन दिवसांची पोलिस कोठडी
12,000 bribe case in Bhusawal : Two-day police custody for punter along with bribe-taking Kotwal भुसावळ : शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उतार्यावर शेतकर्याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ सजाचे कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे (54, रा.भुसावळ) व खाजगी कर्मचारी हरी देविदास ससाणे (44, रा.आंबेडकर नगर, भुसावळ) यांना जळगाव एसीबीने तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी अटक केली होती. लाचखोरांना बुधवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
12 हजारांच्या लाच प्रकरणी अटक
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील 34 वर्षीय तक्रारदाराने 2022 मध्ये भुसावळ तालुक्यातील कुर्हेपानाचे येथे स्वतःच्या नावाने दोन एकर शेतजमिनीची खरेदी केल्यानंतर शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी प्रकरण दिल्याने कुर्हा मंडळाधिकारी योगीता पाटील यांनी त्रृटी काढून कोतवालांशी भेटण्यास सांगितले. कोतवालाने मंडळाधिकार्यांकडून काम देण्यासाठी 15 हजार रुपये सुरूवातीला मागून 12 हजारात तडजोड केली. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी लाच रक्कम तहसील कार्यालयाच्या आवारात देण्यासाठी तक्रारदार आल्यानंतर कोतवालाने इशार्याने खाजगी इसमाकडे लाच देण्याचा इशारा केला. लाच खाजगी इसमाने स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.
संशयितांना दोन दिवसांची कोठडी
बुधवारी दोघा संशयीतांना भुसावळ सत्र न्यायालयात तपासाधिकारी निरीक्षक संजोग बच्छाव यांनी हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या लाच प्रकरणात कुर्हेपानाचे येथील मंडळाधिकारी योगीता पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांचीदेखील चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
