साकळी येथील 55 वर्षीय महिलेचा विहिरीत मृतदेह आढळला
यावल : तालुक्यातील साकळी येथील एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह शिरसाड शिवारातील एका शेत विहिरीमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. ही महिला ही सकाळीच घराच्या बाहेर गेली होती व नंतर तिचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सरलाबाई मनोहर अत्तरदे (55) असे मयत महिलेचे नाव आहे.
मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट
ही महिला बुधवारी सकाळी घराच्या बाहेर गेली होती. दरम्यान दुपारी त्यांचा मृतदेह शिरसाड शिवारातील सुधाकर चित्रे यांच्या शेत विहिरीत आढळला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व घटनास्थळी पोलिसांचे पथक आल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढला व यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठ हलवला. या प्रकरणी यावल पोलिसात रवींद्र रघुनाथ अत्तरदे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.
