ऐनपूर व सुलवाडी येथे वीज चोरी : 12 जणांविरूध्द यावल पोलिसात गुन्हा
यावल : रावेर तालुक्यातील ऐनपूर व सुलवाडी या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरट्यांविरोधात धडक मोहिम राबवण्यात आली. यामध्ये दोन्ही गावात 12 जण वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांना दंड बजावण्यात आला मात्र दंड भरण्यात न आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दंड न भरल्याने अखेर गुन्हा दाखल
ऐनपूर, ता.रावेर येथील विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता देवेंद्र महाजनसह विलास पाटील, शरद भालेराव, विष्णू कुंभार, रत्नाकर बनसोडे या पथकाने ऐनपुर या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. गावात रघुनाथ चिंधु भोई, लालचंद कडू बारी, प्रवीण कडू बारी, रामदास देवचंद कोळी, रवींद्र बिसन वाघ, राजेंद्र गोविंदा भोई व सुनील गंभीर तायडे हे सात जण वीज चोरी करतांना आढळून आले त्याच प्रमाणे याच पथकाने सुलवाडी या गावातदेखील धडक मोहिम राबवली. येथे वसंत नामदेव कोळी, भागवत देवराम पाटील, अनिल सुभाष जोगी, गिरधर दशरथ कोळी व अर्जुन दीपचंद जोगी असे पाच जण वीज चोरी करतांना आढळल्याने दोन्ही गावातील या सर्व 12 जणांना त्यांनी केलेल्या वीज चोरीच्या युनिटनुसार त्यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली मात्र त्यांनी दंड न भरल्याने यावल पोलिस ठाण्यात सहाय्यक अभियंता देवेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
