भुसावळातील एचडीएफसी बँकेच्या सुरक्षा रक्षकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू : उष्माघाताचा संशय
HDFC Bank security guard in Bhusawal dies due to vertigo : Suspected heat stroke भुसावळ : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकूलासमोरील एचडीएफसी बँकेतील सुरक्षा रक्षक सुनील रामदास माळी (48, फालक नगर, यावल) यांचा गुरूवारी दुपारी 3.30 वाजता चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला. उष्माघाताने हा मृत्यू झाल्याची चर्चा असून शवविच्छेदन अहवालाअंती मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट
जामनेर रोडवरील एचडीएफसी बँकेत गेल्या 20 वर्षापासून सुरक्षा रक्षक असलेले सुनील रामदास माळी (48) हे गुरूवारी नेहमीप्रमाणे बॅकेत कामावर आले होते मात्र ड्युटीवर असतानाच त्यांना चक्कर आला व ते खाली पडले. त्यांना तात्काळ डॉ.राजेश मानवतकर यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. माळी यांचा मृत्यू कदाचित उष्माघाताने झाला असावा, असा अंदाज डॉ.मानवतकर यांनी व्यक्त केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार अब्दुल शेख हे पुढील तपास करीत आहे.
