ऐनपूर येथे बारागाड्यांचा धक्का लागल्याने वृद्धाचा मृत्यू ; नऊ भाविक जखमी


An old man died after being hit by a baragada in Ainpur; Nine devotees injured खिर्डी : रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे रविवारी सायंकाळी बारागाड्या ओढताना झालेल्या दुर्घटनेत 60 वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू झाला तर भगताचे साथीदार बगले आणि महिलेसह नऊजण जखमी झाले. दिनकर रामकृष्ण जैतकर (कोळी, 60) असे मृत भाविकाचे नाव आहे.

नियंत्रण सुटल्याने दुर्घटना
ऐनपूरला अक्षय्य तृतीयेच्या दुसर्‍या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. प्रथेप्रमाणे बारीघाट येथे रविवारी सायंकाळी बारागाड्यांची तयारी पूर्ण करण्यात आली. बारीघाट परिसरात बारागाड्या ओढल्या जात असताना रस्त्याच्या दुतर्फा शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती. भगत म्हणून सोपान भील, तर बगले म्हणून सुनील महाजन आणि सचिन महाजन सहायक होते. त्याचवेळी बारागाड्यांवरील नियंत्रण सुटले आणि त्या थेट बाजूला असलेल्या प्रेक्षकांवर धडकल्या. त्यात रस्त्यावर प्रेक्षकांमध्ये उभे असलेले दिनकर रामकृष्ण कोळी (60) यांच्या डोक्याला बैलगाडीच्या जू (दुस्सर) चा धक्का लागला. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. ही दुर्घटना झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला त्यामुळे बारागाड्या नियंत्रीत करताना धावपळ उडाली.

नऊ भाविक जखमी
त्यात मंगलाबाई प्रकाश भील, सुभाष भील, ईश्वर भील, नामदेव भील, किशोर हरी, मोहन एकनाथ महाजन, बगल्यांमध्ये सुनील राजाराम महाजन, जू ओढणारे नारायण शामराव महाजन, ईश्वर रूपा भील हे जखमी झाले. बारागाड्यांपैकी पहिले गाडे गटारात अडकून इतर गाडे त्यावर धडकले. दरम्यान, जखमींना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दिनकर रामकृष्ण कोळी यांना मृत घोषित करण्यात आले. निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर चौधरी, नितीन पाटील योगेश चौधरी व होमगार्ड यावेळी बंदोबस्तावर होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !