किनगावात वीज चोरी : त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल
Electricity theft in Kingaon : A case has been registered against the trio यावल : तालुक्यातील किनगाव येथे विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. गावात तपासणी करतांना तीन जण वीज चोरी करतांना आढळून आल्यानंतर तिघांना दंडाच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आली. मात्र त्यांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
किनगाव, ता.यावल येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता पंकज कांबळेंसह हबीब तडवी, हमीद तडवी, गणेश धनगर, पवन पाटील, दीपक तडवी, गणेश कोळी, दीपक नेवासकर या पथकाने गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवली. यावेळी सरजू बळीराम साळुंखे, हिम्मत पुंडलिक धनगर व ईश्वर चिंतामण धनगर हे तीन जण चोरी करतांना आढळल्याने तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंडाची रक्कम आकारून नोटीस देण्यात आली व वेळेत दंड भरण्याच्या सूचना केल्या मात्र या तिघांनी दंड न भरल्याने तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता पंकज कांबळे यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान करीत आहे.
