भुसावळात तालुका पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपीचे पलायन : अटकेच्या भीतीने 50 फूट उंच पूलावरून मारली उडी


Accused escapes by beating the hands of taluka police in Bhusawal : Fearing arrest, jumps from 50 feet high bridge भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणातील संशयीताने तालुका पोलिसांच्या वाहनातून पलायन केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुभाष गॅरेजजवळील रेल्वे पुलाजवळ घडली. संशयित पुढे व पोलीस मागे असा सिनेस्टाईल प्रकार घडल्यानंतर संशयीताने 50 फूट उंच पुलावरून उडी घेतल्याने संशयिताचा पाय फ्रॅक्चर झाला तर मानेला ईजा झाली. जखमी अवस्थेत संशयित पंकज धनराज ठाकूर (28, साकेगाव, ता.भुसावळ) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार केल्यानंतर रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशिरा संशयिताविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलीला पळवल्याप्रकरणी गुन्हा
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे प्रतिकुल परीस्थितीत कुटूंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या कुटूंबातील 16 वर्ष पाच महिन्यांच्या मुलीला संशयित पंकज ठाकूर यांनी रविवार, 16 एप्रिल रोजी मध्यरात्री फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर भुसावळ तालुका पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. संशयितांचा शोध सुरू असताना ते नाशिकमध्ये आल्याची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर मंगळवारी नाशिक येथे धाव घेत पथकाने दोघांना ताब्यात घेत भुसावळात आणले. पळवून नेणार्‍या अल्पवयीन तरुणीला वैद्यकीय चाचणीसाठी जळगाव येथे नेण्यात आले असून अहवालाअंतीच त्याबाबत माहिती देता येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पोलिसांच्या वाहनातून उडी मारत पलायन
भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, सादीक शेख
जगदीश भोई आदींच्या पथकाने संशयित पंकज ठाकूर यास भुसावळ ट्रामा सेंटरमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आणले होते. चाचणी झाल्यानंतर संशयिताला सरकारी वाहनातून तालुका पोलीस ठाण्याकडे आणत असताना संशयिताने पोलीस वाहनातून उडी घेत पलायन केले. अचानक झालेल्या प्रकारानंतर पोलीस कर्मचारी भांबावले व त्यांनी संशयीताचा पाठलाग सुरू केला व तरुणाने 50 फूट उंच पुलावरून अचानक उडी घेतल्याने त्याच्या मानेला मोठी दुखापत झाली तसेच पायदेखील फ्रॅक्चर झाला. या प्रकारानंतर त्याला ताब्यात घेवून पुन्हा ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले.

सिनेस्टाईल घटनेने शहरात खळबळ
पोलिसांच्या वाहनातून सिनेस्टाईल संशयिताने पलायन केल्याच्या घटनेची शहरात मोठी चर्चा होती. सुमारे 50 फूट उंचीच्या पुलावरून संशयीताने उडी घेतल्यानंतर संशयित पंकज ठाकूर याचा पाय फ्रॅक्चर झाला तर मानेला मोठा झटका बसल्याने वेदनांनी तो विव्हळत असताना तालुका पोलिसांनी त्याला ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारार्थ हलवले. रात्री उशिरा त्यास जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसात रात्री उशिरा सहा.निरीक्षक अमोल पवार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !