भुसावळात भर दिवसा घर फोडले : साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
शेतकरी कुटूंब वडिलांच्या वर्षश्राद्धाला जाताच चोरट्यांची धडक : शहरातील मुक्ताई कॉलनीत उडाली खळबळ
Bhusawal broke into a house in broad daylight : five and a half lakhs instead of lump sum भुसावळ : शहरात जुन्या चोर्या-घरफोड्यांचा तपास थंडबस्त्यात असताना जळगाव रोडवरील मुक्ताई कॉलनीत शेतकर्याच्या बंद घरातून चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज भर दिवसा लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील मुक्ताई कॉलनीतील मंगलमूर्ती हाईटस्मध्ये शेतकरी तुलसीदास चुंद्रकांत चौधरी (67) हे पत्नी कल्पनासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मोठा मुलगा मोहनीष हा नायजेरीया येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे तर लहान मुलगा रजनीश हा पुण्यात नोकरीनिमित्त स्थायीक आहे. मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता तुळशीदास चंद्रकांत चौधरी हे आमोदा (ता.यावल) येथे वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी गेल्याने जाताना त्यांनी मुख्य दरवाजाची केवळ कडी लावली तर सेप्टी डोअरला कुलूप लावले व हीच संधी चोरट्यांनी साधली. वरच्या मजल्यावरील राहुल वाघोदे यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर चौधरी कुटूंब दुपारीच तातडीने शहरात दाखल झाले व त्यांनी शहर पोलिसांना माहिती कळवली.
भर दिवसा साडेपाच लाखांचा ऐवज लांबवला
चोरट्यांनी 48 ग्रॅम वजनाचा एक लाख 20 हजार रुपये किंमतीचा नेकलेस, 50 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस, 75 हजार रुपये किंमतीचा नेकलेस, 75 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 12 हजार 500 रुपये किंमतीच्या अंगठ्या, 22 हजार 500 रुपये किंमतीची अंगठी, 12 हजार 500 रुपये किंमतीचा सोन्याचा कॉईन, 25 हजार रुपये किंमतीचा दहा ग्रॅमचा वेढा, 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, 12 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या रींगा, 12 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन लहान अंगठ्या, अडीच हजारांचे कानातील झुमके, दहा हजार रुपये किंमतीचे चांदीचे कॉईन तसेच 60 हजारांची रोकड असा एकूण पाच लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. सुमारे 20 तोळे वजनाचे दागिणे लांबवण्यात आले असून त्याचे बाजारमूल्य सुमारे 12 लाखाहून अधिक आहे मात्र पोलीस तक्रारीत जुन्या दरानुसार ऐवजांचे मूल्य दर्शवण्यात आले आहे.
पोलीस अधिकार्यांची धाव
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोदकुमार गोसावी व डीबी पथकातील गोस्वामी, संदेश निकम, चंद्रशेखर गाडगीळ व पोलीस कर्मचार्यांसह डीवायएसपी यांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील, रमण सुरळकर आदींनी धाव घेत पाहणी केली. मंगळवारी व बुधवारी या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे कसून तपासण्यात आले.
