रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून एकाच दिवसात 33 लाखांचा दंड वसुल
कारवाईने उडाली खळबळ : भुसावळ विभागात 42 गाड्यांमध्ये विशेष पथकाकडून तपासणी
33 lakh fines collected from free passengers in railways in a single day भुसावळ : रेल्वेतील वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत अनेक फुकटे प्रवासी रेल्वेतून प्रवास करीत असल्याने फुकट्या प्रवाशांना पायबंद घालण्यासाठी भुसावळ विभागात तिकीट तपासणीची विशेष मोहिम हाती घेण्यात आली. चार अधिकारी व 81 तिकीट तपासणी कर्मचार्यांसह रेल्वे सुरक्षा बलाच्या 21 कर्मचार्यांची मदत घेत अप-डाऊन 42 गाड्यांमध्ये मंगळवार, 25 रोजी तपासणी करण्यात आली. त्यात एक हजार 619 प्रवाशांकडे तिकीट न आढळल्याने त्यांच्या 11 लाख 11 हजार 40 हजारांचा दंड वसुल करण्यात आला तर एकाच दिवसातील नियमित तपासणीत चार हजार 190 प्रवाशांकडून 33 लाख 35 हजार 310 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याने फुकट्या प्रवाशांच्या गोटात खळबळ उडाली.
वाढत्या गर्दीचा फायदा फुकट्या प्रवाशांच्या पथ्थ्यावर
लग्नसराई, उन्हाळी सुटीमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची तोबा गर्दी वाढली आहे. तिकीट खिडकीवरील गर्दीमुळे अनेक जण विनातिकीट, आरक्षण नसताना आरक्षित डब्यातून प्रवास करतात तर स्लीपर कोचचे आरक्षण असताना एसी डब्यातून प्रवास करतात. काही प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त लगेज सोबत बाळगतात. यामुळे रेल्वेच्या उत्पनावर परीणाम होतो व नियमानुसार तिकीट काढून, आरक्षण करून प्रवास करणार्यांना त्रास होतो. जनरल डब्यात असलेली गर्दी पाहून टीसीदेखील अनेकदा फिरकत नसल्याने फुकट्या प्रवाशांचे फावते.
अचानक तपासणी मोहिमेने खळबळ
भुसावळ विभागाचे डीआरएम एस.एस.केडिया, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, 25 एप्रिल रोजी दिवसभरात विशेष मोहिम राबवण्यात आली तसेच नियमित तपासणी करण्यात आल्यानंतर फुकट्या प्रवाशांकडून चार हजार 190 प्रवाशांकडून 33 लाख 35 हजार 310 रुपयांचा दंड वसुल करण्यात आाला. अप-डाऊन मार्गावरील 42 धावत्या गाड्यांमध्ये तसेच रेल्वे स्थानकावर पथकाकडून तपासणी करण्यात आली.
युटीएस अॅपचा वापराचे आवाहन
रेल्वे प्रवाशांनी कटू कारवाई टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून योग्य वर्गाच्या डब्यातच प्रवास करावा, असे आवाहन वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी केले आहे. रेल्वे प्रवाशांनी तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगेपासून सुटका करण्यासाठी युटीएस अॅपचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
