भुसावळातील रस्त्यांसह अमृत योजनेचा प्रश्न मार्गी लावणार
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही : परत गेलेल्या निधीचीही होणार चौकशी
भुसावळ : भुसावळ शहरात अमृत योजना का रखडली वा यात कोण दोषी आहे? याची माहिती घेणार असून निश्चित यात कारवाई होईल व अमृत योजनेचा प्रश्न मार्गी लावू तसेच प्रशासकीय स्तरावर रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिली. एका खाजगी कार्यक्रमानिमित्त ते भुसावळात शनिवारी आले असता प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. भुसावळातील अमृत योजनेचे तीन वर्षानंतरही काम झाले नसल्याने दोषींवर कारवाई करणार का? या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यात अमृत योजनेचा आढावा घेतला जाईल व दोषी कुणीही असो त्यांच्यावर निश्चित कारवाई करू, असेही ते म्हणाले. भुसावळ पालिकेत रस्त्यांसाठी आलेला 12 कोटींचा निधी पुन्हा परत गेला असून प्रशासकीय मान्यतेअभावी रस्त्यांची कामे खोळंबली असल्याची माहिती पाटील यांना दिल्यानंतर 20 जानेवारी रोजी आयोजित डीपीडीसीच्या बैठकीत याची चौकशी करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
