राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची शरद पवार यांची घोषणा


Sharad Pawar Announces Decision to Step Down as NCP President: ‘One Has to Stop Somewhere’ मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घोषणेनंतर कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले असून त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
साहेब आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही, आपण आपला निर्णय मागे घ्या, आम्हाला आपला खूप मोठा आधार वाटतो, अशी भावनिक साद घालत कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा तास ही घोषणाबाजी सुरू होती. शेवटी अजित पवार यांनी माईक हाती घेऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना केली. तोपर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी मंचावर शरद पवारांना गराडा घातला होता. राष्ट्रवादीचे एकएक करुन नेते मंडळी पवारांना विनंत्या करत होते. धनंजय मुंडे तर पवारांच्या पायाशी बसून राहिले. शेवटी नेते-कार्यकर्त्यांच्या मताचा रेटा पाहून माझ्या घोषणेवर समिती जो निर्णय घेईन, तो निर्णय पवारसाहेबांना मान्य असेल, असं अजित पवार म्हणाले. तरीही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. साहेबांचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही गावाला जाणार नाही, असं कार्यकर्ते म्हणाले.





पवार काय म्हणाले?
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून गेली 24 वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील 1 मे 1960 पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली 63 वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी 56 वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील 3 वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. सार्वजनिक जीवनातील 1 मे, 1960 ते 1 मे, 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल.

आम्ही कुणाकडे जायचे : जितेंद्र आव्हाड
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, साहेब आपण सर्वांचे अश्रू बघताय, भावनाही बघताय…आपण कार्यकर्त्याचा चेहरा पाहून त्याच्या मनात काय आहे, हे ओळखणारे जादूगार आहात. वय तुमच्यासाठी काही प्रश्न नाही. मी 2004 साली नागपूरमध्ये तुमच्या अंगातून रक्त वाहत असताना प्रचार करताना पाहिलं आहे. त्यापेक्षा आताची तुमची तब्येत खूप चांगली आहे. अशा अवस्थेत तुम्ही पक्ष सावरला आणि पक्षाला सत्तेत ठेवत आलात. सत्ता ही महत्वाची नाही, पण तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही. मी नेहमी तुमचे दर्शन घेतो, पुढचे दहा दिवस आरामात जातात. तुम्ही नसाल तर आमचं जीवनंच व्यर्थ आहे. आता येवढ्या अडचणी समोर असताना आम्ही कोणाकडे जायचं…अशा भावना जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !