यावलमध्ये पाच घरे फोडली : दोन लाखांवर ऐवजावर डल्ला
यावल : शहरातील कृष्णतारा नगरात शनिवारी पहाटे चोरट्यांनी पाच घरे फोडल्याने शहरात खळबळ उडाली असून नागरीकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावल शहरातील कृष्णतारा नगरातील रहिवासी व छतीसगड सीआरपीएफमध्ये नोकरीस असलेल्या लतीफ नामदार तडवी यांचे कुटुंब या भागात राहते. त्यांच्या पत्नी जरीना लतीफ तडवी व त्यांच्या शेजारी शावखा आमद तडवी या परसाडे, ता.यावल येथे यात्रेनिमित गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. दरवाज्याचे कुलूप तोडुन घरातील कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लांबवण्यात आले. दरम्यान, या घरांपासून काही अंतरावर बांधकाम केलेल्या मात्र रहिवासी नसलेल्या तीन घरांचे कुलूप तोडण्यात आले मात्र त्यातून काहीही वस्तूंची चोरी झाली नसल्याचे समजते. चोरटे संख्येने चार व पाच असल्याची शक्यता असून त्यांच्याकडे दुचाकी असल्याचे घटनास्थळाजवळील सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले आहे.
