भुसावळातील व्यापारी ललित नेमाडे यांचा अपघाती मृत्यू : चारचाकी चालकाविरोधात गुन्हा
Accidental death of businessman Lalit Nemade in Bhusawal : Crime against four-wheeler driver भुसावळ : हरताळा येथून देवदर्शन करून भुसावळकडे परतणार्या भुसावळातील व्यापार्याचा फुलगाव फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला कट मारल्यानंतर दुचाकी दुभाजकावर धडकून मृत्यू झाला तर व्यापार्याची पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील फुलगाव फाट्यावर शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला. ललित प्रभाकर नेमाडे (48, राम मंदिर वॉर्ड, भुसावळ) असे मयत व्यापार्याचे नाव असून ते भुसावळातील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक होत. व्यापार्याच्या अपघाती निधनाने शहरातील राम मंदिर वॉर्डासह मॉडर्न रोडवरील व्यापार्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुभाजकावर आदळली दुचाकी
भुसावळातील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक ललित प्रभाकर नेमाडे (48) हे पत्नी निता नेमाडे (38) यांच्यासह हरताळे, ता.मुक्ताईनगर येथे चक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी शुक्रवारी सकाळी सात वाजता दुचाकी (एम.एच.19 डी.एस.3356) ने गेले होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दाम्पत्य दर्शनाहून भुसावळकडे परत असताना राष्ट्रीय महामार्गावरील फुलगाव उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने नेमाडे यांची दुचाकी दुभाजकावर आदळल्याने नेमाडे यांचा जागीच मृत्यू ओढवला तर त्यांच्या पत्नी निता यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. नेमाडे हे गेल्या 15 वर्षापासून हरताळा येथे दर बुद्ध पौर्णिर्मेला हरताळा येथे दर्शनाला जात होते मात्र शुक्रवारी क्रुर काळाने त्यांच्यावर घाला घातला. अत्यंत हसतमुख व्यक्तीमत्व असलेल्या नेमाडे यांच्या निधनाने भुसावळातील व्यापारी वर्गातून ह
ळहळ व्यक्त करण्यात आली.
तासभर 108 आलीच नाही
नेमाडे यांचा अपघात झाल्यानंतर अनेकांनी 108 रुग्णवाहिकेला कळवले मात्र सुमारे तासभर होवूनही रुग्णवाहिका न आल्याने संताप व्यक्त करण्यात आला शिवाय वाहन धारकांपैकी कुणीही अपघातस्थळी थांबले नाही. यावेळी मोटरसायकलवर ढाके दाम्पत्य आल्यानंतर त्यांनी चौकशी केल्यानंतर भुसावळात अपघाताची माहिती कळाली व मित्र परीवाराने अपघातस्थळी धाव घेतली.
अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा
अपघाताग्रस्त नेमाडे यांच्या परीवारातील सदस्य हे पुण्यात असल्याने त्यांना माहिती कळवण्यात आली आहे. मृत नेमाडे यांच्या पश्चात पत्नी निता, मुलगा, आई, बहीण असा परीवार आहे. अपघाताची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक आशीशकुमार अडसूळ व पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी निता नेमाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
